पालकमंत्र्यांच्या घरावर पाण्यासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:20 PM2018-05-13T22:20:43+5:302018-05-13T22:20:43+5:30
निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या. अर्धा तास ठिय्या देऊन बसल्यावरही पालकमंत्र्यांची भेट न झाल्याने त्या चिडल्या. शेवटी, मंत्र्यांच्या ‘पीआरओ’लाच महिलांची समजूत काढून त्यांना परत पाठवावे लागले.
शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेषत: महिलावर्ग वैतागलेला आहे. डोर्लीपुऱ्यातील प्रभाग क्रमांक दोन आणि आठमध्ये महिनाभरापासून पाणी मिळणे अवघड झाले आहे. या परिसरातील बोअरही आटल्या आहेत. विहिरींची पातळी खाली गेली आहे. गेल्या महिन्यापासून तर नळालाही पाणी आलेले नाही. अशा स्थितीत एका टँकरने कसाबसा पाणीपुरवठा केला जात आहे. या एकाच टँकरवर दहा हजार लोकांची तहान कशी भागणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील महिलांनी रेटून धरली आहे.
या भागाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी त्यांच्या कोट्यातील टँकरद्वारे या भागात पाणी वितरित करावे, अशी मागणी घेऊन संतप्त महिलांनी रविवारी मोर्चा काढला. हा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर धडकल्यावर घोषणाबाजी झाली. या आंदोलनाचे नेतृत्व प्रमोदिनी रामटेके यांनी केले. यावेळी बेबी लांजेवार, बेबी राठोड, लक्ष्मी शेंद्रे, देवकाबाई वाघमारे, विनोद वाघदरे, सोनू नैताम, ज्ञानेश्वर नाकतोडे, गंगाधर खडसे, विद्या वाघदरे, देवका मराठे, शोभा ठाकरे, मंदा चिकाने, शोभा ठाकरे, गीता चौधरी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
पीआरओंनी काढली मोर्चेकºयांची समजूत
धुणीभांडी, कॅटरर्स आणि रोजमजुरी करणारा वर्ग या परिसरात राहतो. त्यांनी काम करायचे की पाणी भरायचे, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु, त्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी पालकमंत्रीच यावेळी उपस्थित नव्हते. त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यालाच या मोर्चेकरी महिलांची समजूत काढावी लागली. दोन दिवसात पाणी मिळेल, असे सांगितल्याने अर्धातास ठिय्या देऊन या महिला निघून गेल्या. आता त्यांना आपल्या भागात पाणी येण्याची प्रतीक्षा आहे.