पेन्शनर काढणार गाढवांसह मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:22 PM2019-05-11T23:22:17+5:302019-05-11T23:23:25+5:30
शरीर थकल्याने समस्या मांडण्यासाठी इमारतीची एक पायरीही चढणे सेवानिवृत्तांना कठीण झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेचे प्रशासन सेवानिवृत्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दोन-दोन महिने त्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शरीर थकल्याने समस्या मांडण्यासाठी इमारतीची एक पायरीही चढणे सेवानिवृत्तांना कठीण झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेचे प्रशासन सेवानिवृत्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दोन-दोन महिने त्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कास्ट्राईब पेन्शनर असोसिएशन १३ मे रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्चाचे स्वरूप यावेळी अनोखे आणि तेवढेच लक्षवेधी ठरणार आहे. मोर्चात १५ ते २० गाढवांचा सहभाग करून घेतला जाणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध म्हणून मोर्चात गाढव राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महासचिव प्रभाकर जीवने यांनी कळविले आहे. बसस्थानक चौकातून नेताजी चौक, जुनी मेनलाईन चौक, इंदिरा मार्केट, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, समता मैदान आदी भागातून वाजतगाजत मोर्चा काढला जाईल. जिल्हा परिषदेवर धडकलेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. तत्पूर्वी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले जाणार आहे.
मार्च व एप्रिलचे सेवानिवृत्ती वेतन पेन्शनर्सच्या बँक खात्यात तत्काळ जमा करावे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करून सुधारित दराने पेन्शन लागू करावी, वेळोवेळी वाढणारी महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, चार तारखेच्या आत सेवानिवृत्ती वेतन जमा करावे या मागण्या आहेत.
सेवानिवृत्तांच्या मोर्चासंदर्भात जिल्हा परिषदेला नोटीस देण्यात आली आहे. शांततापूर्वक मोर्चा काढला जाणार आहे. समारोप जिल्हा परिषदेसमोर होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन राजेंद्र नखाते, हेमराज धोटे, दीपक ढोले, रामटेके, रवी श्रीरामे आदींनी केले असल्याचे कळविले आहे.