भाजपा जिल्हाध्यक्षासाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: January 22, 2016 03:09 AM2016-01-22T03:09:03+5:302016-01-22T03:09:03+5:30
विद्यमान भाजपा जिल्हाध्यक्षाचा कार्यकाळ १७ जानेवारीलाच संपल्याने या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी चालविली
यवतमाळ : विद्यमान भाजपा जिल्हाध्यक्षाचा कार्यकाळ १७ जानेवारीलाच संपल्याने या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. भाजपा सत्तेत असल्याने दावेदारांची संख्या वाढली आहे. परिणामी भाजपा जिल्हाध्यक्षाची थेट नियुक्ती होण्याचे संकेत आहे. यासाठी प्रदेश महामंत्र्यांनी येथील विश्रामगृहावर कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
भाजपा जिल्हाध्यक्ष आपल्या मर्जीतील असावा असा सूर स्थानिक आमदारांचा आहे. यापूर्वी राजेंद्र डांगे यांच्या नियुक्तीला सर्वांचा होकार मिळाल्यानंतरही केवळ स्थानिक आमदाराच्या होकारासाठी ही नियुक्ती दोन महिने लांबली होती. शेवटी सर्वांचे एकमत झाल्याने राजेंद्र डांगे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने जिल्ह्यात काँग्रेसचा सफाया केला खरा मात्र पक्ष वाढीसाठी अनेक मर्यादा पुढे आल्या आहे. सत्ताधारी भाजपात अजूनही तळागाळाच्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळत नसल्याची ओरड आहे. संघटन आणि आमदार यांच्यात फारसे सौख्य दिसत नाही. उमरखेडच्या एका पदाधिकाऱ्याने आपली खंत जाहीर कार्यक्रमात बोलून दाखविली होती. त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्षाची निवड केली जात आहे. स्थानिक आमदाराने एका इच्छुकाला केंद्रीय मंत्र्याकडून फिल्डींग लावण्याचा सल्ला दिला आहे. इच्छुक भाच्याने मामाच्या मदतीने गडकरी वाड्यावर हजेरीही लावली आहे. भाजपातील एका प्राध्यापकाने संघ प्रांत प्रचारकाच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहे.
प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. विदर्भाचे संघटन मंत्री, विभाग प्रचारक, क्षेत्रीय प्रचारक या संघातील पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. संघटन सचिवांकडून शब्द मिळाल्याचे काही दावेदार खासगी सांगताना दिसत आहे. पक्षाने सर्व प्रथम विद्यमान पाच आमदारापैकी कोणी एकाने जबाबदारी स्वीकारावी, अशी आॅफर ठेवली होती. मात्र याबाबत कुणी उत्सुक दिसले नाही. त्यामुळे राजेंद्र डांगे यांनाच पुन्हा संधी मिळावी यासाठी संघातील फळी सक्रिय झाली आहे. या घडामोडीत आमदारांकडूनही आपल्याच मर्जीतील व्यक्तीचे नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या निवडीची गुंतागुंत वाढली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)