जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
By admin | Published: August 24, 2016 01:01 AM2016-08-24T01:01:01+5:302016-08-24T01:01:01+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग रचना व आरक्षणाची घोषणा होताच लगेच इच्छुकांनी मोर्चेांधणी सुरू केली आहे.
आरक्षणाकडे लक्ष : गट व गणांच्या रचनेची तयारी
यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग रचना व आरक्षणाची घोषणा होताच लगेच इच्छुकांनी मोर्चेांधणी सुरू केली आहे. सोयीच्या प्रभाग रचनेसाठी इच्छुकांनी धावपळ चालविली असून एकाचवेळी नगरपरिषद आणि जिलहा परिषद गटात नाव नोंदणीचीही धडपड सुरू केली आहे.
आरक्षणाच्या जागेसह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव ९ सप्टेंबरपर्यंत आयुक्तांकडे सादर होणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबरला आयुक्त प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे. आता प्रारूप प्रभाग रचनेसाठी अवघे १५ दिवस उरले आहे. या १५ दिवसांत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कोणत्या गट व गणात नेमकी कोणती गावे समाविष्ट होतील, याचा अंदाज ९ सप्टेंबरलाच येणार आहे. २३ सप्टेंबरला आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना आम जनतेला माहिती होणार आहे. मात्र इच्छुकांना ९ सप्टेंबरलाच त्याचा अंदाज येणार आहे.
यवतमाळ शहरालगतचा वडगाव गट निवडणूक आयोगाने रद्द केला. मात्र वडगाव गटात येणारी इतर गावे नेमकी आता कोणत्या गटात व गणात समाविष्ट होतात, याची उत्सुकता कायम आहे. याशिवाय जिल्ह्यात नव्याने सहा नगरपंचायती स्थापन झाल्या. यापूर्वी या सर्व नगरपंचायती जिल्हा परिषदेत होत्या. आता या सहा गटातील उर्वरित गावे कोणत्या नवीन गटात समाविष्ट होतात, याकडे तेथील जनतेचे लक्ष लागले आहे.
राळेगाव, मारेगाव, झरी, कळंब, बाभूळगाव आणि महागाव येथे नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहे. पूर्वीच्या या गटातील इतर गावे आता नवीन गट व गणात सहभागी होतील. त्यामुळे या सहाही तालुक्यात नवीन गट आणि गण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. त्यात काही गावे जुन्या गट व गणात कायम राहतील, तर काही गावे दुसऱ्या गट व गणात सामविष्ट होईल. नवीन प्रभाग रचनेबाबत ग्रामीण भागात उत्सुकता निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)