चिंतामणी देवस्थानच्या विश्वस्तांसाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: July 24, 2016 12:41 AM2016-07-24T00:41:52+5:302016-07-24T00:41:52+5:30
येथील श्री चिंतामणी देवस्थानच्या विश्वस्तांसाठी २ आॅगस्ट रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहे.
शिफारशीसाठी धावपळ : लोकप्रतिनिधींकडे चकरा वाढल्या
गजानन अक्कलवार कळंब
येथील श्री चिंतामणी देवस्थानच्या विश्वस्तांसाठी २ आॅगस्ट रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहे. विश्वस्त म्हणून नेमणूक होण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय शिफारशी मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू करण्यात आले आहे.
विश्वस्त होण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी अर्ज सादर केलेले आहे. यात राजकीय पक्षांशी संबंधित असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एवढेच नाही तर, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, माजी विश्वस्त, शेतकरी, व्यावसायिक यांनीही धडपड चालविली आहे. त्यांनी आपल्या गॉडफादरमार्फत फिल्डींग लावण्याच्या कामाला वेग दिला आहे. स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, राज्यमंत्री एवढेच नाही तर, मंत्र्यांपर्यंत हा विषय नेण्यात आला आहे. त्यांच्या संमतीनेच अनेकांनी अर्ज सादर केले आहे. एकंदरीत अर्जाची संख्या लक्षात घेता विश्वस्त बनने पाहिजे तेवढे सोपे नाही, हे दिसून येते. काहींनी तर धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संधान बांधण्याचा प्रयत्न चालविला आहे.
विशेष म्हणजे श्री चिंतामणी देवस्थानमध्ये कार्यरत अॅडव्हॉक बॉडी एप्रिल २०१५ मध्ये न्यायालयाने बरखास्त केली होती. नवीन विश्वस्तांची रितसर निवड करण्याच्या सूचना न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिल्या. यावरून एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला. आता कुठे विश्वस्त निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मागील १३ वर्षांपासून चिंतामणी देवस्थानमधील विश्वस्तांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू होती. आधीच फार काळ चाललेल्या विश्वस्तांच्या भांडणामुळे श्री चिंतामणीचा विकास ठप्प झाला. त्यामुळे सहधर्मादाय आयुक्त, यवतमाळ यांना श्री चिंतामणी देवस्थानच्या घटनेतील कलम नऊ प्रमाणे नवीन विश्वस्तांची निवड प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश होते. यानुसार नवीन विश्वस्तांची निवड केली जाणार आहे.