मशागत पूर्ण, पावसाची प्रतीक्षा
By Admin | Published: June 15, 2014 11:48 PM2014-06-15T23:48:04+5:302014-06-15T23:48:04+5:30
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीसाठी पाहिजे तसा क्रियाशिल पाऊस अद्याप झालेला नाही. जिल्ह्यातील ७० टक्केपेक्षा अधिक शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून
यवतमाळ : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीसाठी पाहिजे तसा क्रियाशिल पाऊस अद्याप झालेला नाही. जिल्ह्यातील ७० टक्केपेक्षा अधिक शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून पेरणीची लगबगसुद्धा सुरू झाली आहे. आता केवळ पावसाची प्रतिक्षा असल्याचे दिसून येते.
काही भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु पावसामध्ये सध्यातरी कोणतेही सातत्य दिसून येत नाही. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांची मशागतीसाठी लगबग सुरू झाली आहे. मशागतीची कामे पूर्ण दिसून येत आहे. तर आगामी काळात दमदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने मान्सूनपूर्व हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी बांधवांनी शेतीची मशागतीची कामे जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर शेत कुळवून काढले की चांगला पाऊस पडताच लगेच पेरणीला सुरुवात होणार आहे. यावर्षी मृग नक्षत्रआत समाधानकारक पावसाची अपेक्षा असल्याने ७ जूनपूर्वी शेती तयार करणे गरजेचे होते. अल्प दिवसाचा कालावधी शिल्लक राहिल्यामुळे बळीराजा शेती कामात मग्न होता. एकीकडे लग्न समारंभाची लगबग असताना दुसरीकडे शेतीची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू झाली आहे. आता बळीराजा मृग नक्षत्रातील पावसाच्या प्रतिक्षेत आहे. ६ जूनच्या पहाटे साडेचारच्या सुमारास पुसदसह इतरही अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व दमदार पावसाने हजेरी लावली.
यावर्षी मृगाचा पाऊस वेळेवर येणार असा वेधशाळेचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे व रासायनिक खताची साठवणूक करण्यात सुरुवात केलेली आहे. लाकडी अवजारांचे भाव वाढल्याने शेतकरी लोखंडी व प्लास्टीक अवजारांकडे वळाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे लाकडांपासून तयार केलेल्या वस्तूंची मागणी घटली आहे.
एरवी सुताराकडे होणारी गर्दीही आता कमी झाली आहे. सध्या बाजारपेठेत कडब्याच्या गंजी झाकण्यासाठी गोठ्यावर तसेच घरावर आच्छादन टाकण्यासाठी प्लास्टिक ताडपत्रीला चांगली मागणी होत आहे. तसेच गोठा व घरासाठी टिनपत्रे खरेदीसाठी शेतकऱ्यांची शहरात एकच भाऊगर्दी दिसत आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक, तिफन, चाडे, नळे यांच्या खरेदीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता क्रियाशिल पावसाने शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होणार आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या हातातून आधी खरीप व नंतर रबी हंगाम गेला. त्यामुळे आता सर्व आशा खरिपाच्या हंगामावर लागलेल्या आहेत. (प्रतिनिधी)