पुसदमध्ये कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:46+5:302021-07-08T04:27:46+5:30
शहरासह तालुक्यातील विविध कार्यालयांतील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना खोट्या तक्रारी करून जेरीस आणणे, त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांच्याविरुद्ध साप्ताहिकाचा ...
शहरासह तालुक्यातील विविध कार्यालयांतील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना खोट्या तक्रारी करून जेरीस आणणे, त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांच्याविरुद्ध साप्ताहिकाचा आधार घेऊन खोट्या व चुकीच्या बातम्या छापणे, माहिती अधिकाराचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना चिरीमिरीची मागणी करणे, असे एक ना अनेक गंभीर आरोप येथील एका साप्ताहिकाच्या पत्रकारावर करण्यात आले आहेत. या पत्रकाराला आवर घालून त्याची चौकशी करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे केल्याची माहिती आहे.
येथील एका साप्ताहिकाचा पत्रकार राजू राठोड याच्याविरोधात २०१६ मध्ये एमएसईबीच्या एका कनिष्ठ अभियंत्याला खंडणी मगितल्याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. वन विभागात कार्यरत लिपिक गोपाल जिरोनकर यांच्याविरुद्ध या पत्रकाराने विविध तक्रारी करून हे थांबवायचे असेल तर तब्बल एक लाखाची मागणी केली होती. त्यामुळे त्रस्त जिरोनकर यांनी शहर पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी भादंवि ३८४ नुसार गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरणसुद्धा न्यायप्रविष्ट आहे.
हा पत्रकार माहिती अधिकाराचा गैरवापर करून सप्ताहिकामध्ये खोट्या व चुकीच्या बातम्या प्रकाशित करून विविध शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक मानसिक त्रास देत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. त्याच्या या वर्तनामुळे उपविभागातील अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. त्या पत्रकाराला वेळीच आवर घालावा व चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, लोकायुक्त, अमरावती कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.