शेतकर्‍यांना आकर्षित करण्याचे फंडे

By admin | Published: June 6, 2014 12:13 AM2014-06-06T00:13:57+5:302014-06-06T00:13:57+5:30

खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. अतवृष्टीमुळे सोयाबीनसारखे पीक हातातून गेले आहे. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडणार असल्यामुळे कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याचे सल्ले देणे सुरू केले आहे.

Funds to attract farmers | शेतकर्‍यांना आकर्षित करण्याचे फंडे

शेतकर्‍यांना आकर्षित करण्याचे फंडे

Next

जादा उत्पन्नाचे दावे : कृषी केंद्र संचालकांना विविध आमिषे
यवतमाळ : खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. अतवृष्टीमुळे सोयाबीनसारखे पीक हातातून गेले आहे. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडणार असल्यामुळे कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याचे सल्ले देणे सुरू केले आहे. अशातच संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी विविध बियाणे कंपन्यांनी अभिनव फंडे शोधले आहे. जादा उत्पादनाची हमी देणारी फलके कृषी केंद्र व दर्शनीय ठिकाणी लावल्यामुळे शेतकर्‍यांचा संभ्रम वाढला आहे.
यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा पडल्यामुळे कपाशीच्या लागवडीकडे शेतकर्‍यांनी मोर्चा वळविला आहे. अशातच मागील दोन महिन्यांपासून विविध कपाशी बियाण्यांच्या कंपन्यांनी आपल्या वाणाचे दावे करण्याची अभिनव शक्कल लढविली आहे. शेतकर्‍यांना आपलेच बियाणे कसे जादा उत्पन्न देणारे आहे, हे सांगण्यासाठी मोठाले फलक लावण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांना प्रत्यक्षात एकरी दहाही क्विंटल कापूस झाला नाही अशा शेतकर्‍यांच्या नावे एकरी १८ ते २0 क्विंटल उत्पन्न घेतल्याचे जाहिरातीच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे. वास्तविक पाहता जे शेतकरी एकरी १५ क्विंटलच्या वर उत्पन्न घेतात त्या शेतकर्‍यांकडे ओलिताची व्यवस्था असते. मात्र जाहिरात फलकावर ओलिताच्या व्यवस्थापनाबाबत काहीही नमूद केलेले नसते. जाहिरात फलकावरील शेतकर्‍याला उत्पादन झाले. मग आपल्याला का होणार नाही, या भावनेतून अनेक शेतकरी जाहिरातबाजीला बळी पडताना दिसत आहे.
एकीकडे सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडला असताना सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी मात्र वाढली आहे. अशातच तुटवड्याच्या नावाखाली एका बॅगला तीन हजार रुपये वसूल करण्याचा फंडाही कृषी केंद्र संचालकांनी वापरणे सुरू केले आहे. सोयाबीनचा जादा अँवरेज देणारे बियाणे अमक्या कंपनीचे आहे. त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात, अशा प्रकारचे प्रलोभन शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे कपाशीच्या बियाण्याची जादा विक्री व्हावी म्हणून काही कंपन्यांनी कृषी केंद्र संचालकांना विविध ऑफर्स दिल्याची माहिती आहे. या माध्यमातून बँकॉकसारख्या देशातील दौरेही ठरविण्यात आले आहे.
ज्या कृषी केंद्र संचालकांना परदेशात जावयाचे नाही त्यांना मात्र परदेश दौर्‍यासाठी लागणारी रक्कम नगदीत कापून दिल्या जात असल्याची चर्चा आहे.
अतवृष्टी व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना बियाणे घेण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना कृषी केंद्र संचालक व काही कंपन्या मात्र भ्रममुलक दावे करणारे वाण शेतकर्‍यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Funds to attract farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.