कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीची प्रेतयात्रा
By admin | Published: February 26, 2015 01:58 AM2015-02-26T01:58:11+5:302015-02-26T01:58:11+5:30
रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप करीत चक्क कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात शिवसैनिकांनी डांबर मिश्रित गिट्टी टाकून खुर्चीची प्रेतयात्रा काढली.
यवतमाळ : रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप करीत चक्क कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात शिवसैनिकांनी डांबर मिश्रित गिट्टी टाकून खुर्चीची प्रेतयात्रा काढली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ही खुर्ची भेट दिली. येथील जिल्हा परिषद बांधकाम क्रमांक-१ मध्ये बुधवारी दुपारी घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
यवतमाळ शहरानजीकच्या वाघापूर परिसरात रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. खासदार भावना गवळी यांच्या निधीतून महात्मा फुले सोसायटीमध्ये सदर काम करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या कामात ३५ टक्के डांबराचा वापर आणि बीबीएम कारपेट न टाकताच रस्ता तयार करण्यात येत असून त्याकडे बांधकाम विभाग डोळेझाक करीत आहे. या प्रकाराने शिवसैनिक संतप्त झाले. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद सदस्य मंदा गाडेकर, वाघापूरचे सरपंच संजय कोल्हे, लता ठोंबरे, राज कोल्हे, मनीषा चौधरी, ललिता वाघ, राजू गिरी आदी शिवसैनिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सहारे यांच्या कक्षात धडकले. या ठिकाणी त्यांनी सोबत आणलेली गिट्टी टाकली. तसेच कक्षातील खुर्ची उचलून चक्क प्रेतयात्रा काढीत जिल्हा परिषद गाठली.ही खुर्ची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना भेट देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. या प्रकाराला कंत्राटदार आणि वरिष्ठ जबाबदार असल्याचा आरोप केला. यावेळी अनंत उंबरकर, चेतन काळे, इशू मावळे, राजू मेहरे, संतोष चंदनखेडे, रमेश भगत, बबन गावंडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.जिल्हा परिषद बांधकाम विभागात घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली. (शहर वार्ताहर)