तणावपूर्ण वातावरणात प्रवीण दिवटेवर अंत्यसंस्कार
By Admin | Published: August 29, 2016 12:48 AM2016-08-29T00:48:19+5:302016-08-29T00:48:19+5:30
येथील काँग्रेसचा माजी नगरसेवक तथा कुख्यात प्रवीण दिवटे याच्या पार्थिवावर रविवारी सकाळी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हजारोंंचा जनसमूदाय : शहरातील बाजारपेठ बंद
यवतमाळ : येथील काँग्रेसचा माजी नगरसेवक तथा कुख्यात प्रवीण दिवटे याच्या पार्थिवावर रविवारी सकाळी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत हजारोंंचा जनसमूदाय सहभागी झाला होता. अंत्ययात्रेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच भाजी मंडीसह बाजारपेठ दुपारपर्यंत बंद होता.
प्रवीण दत्तूजी दिवटे (४३) याचा गोळ्या झाडून आणि तलवारीचे घाव घालून शनिवारी सकाळी निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. रविवारी सकाळी ११ वाजता वाघापूर रोडवरील त्याच्या राहत्या घरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत यवतमाळ शहरासह विदर्भातील त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
शहरातील स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफीस, हनुमान आखाडा, नगर परिषद, शनि मंदिर चौक मार्गे अंत्ययात्रा पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात पोहोचली. अंत्ययात्रा मार्गावरुन जात होती, त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फाही नागरिकांनी गर्दी केली होती. अंत्ययात्रेच्या मार्गात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
काही काळासाठी या मार्गावरील वाहतूकही रोखण्यात आली. मोक्षधामात पाय ठेवायलाही जागा नव्हती. प्रवीण दिवटे याच्या पार्थिवाला त्याच्या दोन मुलींनी भडाग्नी दिला. याठिकाणी अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
प्रवीण दिवटेची निर्घृण हत्या झाल्याचे शनिवारी माहीत होताच संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता.
दरम्यान रविवारीही शहरात तणावसदृश वातावरण होते. येथील विठ्ठलवाडी परिसरातील भाजीमंडीत रविवार असतानाही भाजीपाल्यांचा लिलाव झाला नाही. तसेच अंत्ययात्रेच्या मार्गावरील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. (कार्यालय प्रतिनिधी)
तपासासाठी तीन पथके
खुनाच्या घटनेनंतर आरोपींना तत्काळ अटक व्हावी या उद्देशाने तीन तपास पथकांचे गठण करण्यात आले. टोळी विरोधी पथकातील विभाजन करुन दोन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक अशा तीन पथकावर यातील आरोपींना अटक करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. खुनातील आरोपी घटनेनंतर पांढरकवडा मार्गावरील सोनखास येथून रविवारी सकाळी आॅटोरिक्षाने मेटीखेडापर्यंत पोहोचले आणि तेथून हे आरोपी पुढे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. थोड्या फरकाने आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटल्याचेही सांगितले जाते. तपास शहरचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्याकडे देण्यात आला आहे.
बंटी जयस्वालला तीन दिवसांची पोलीस कोठडी
प्रवीण दिवटे खून प्रकरणात शनिवारी पोलिसांनी नगरपरिषदेचा स्वीकृत सदस्य बंटी उर्फ आनंद जयस्वाल याला ताब्यात घेतले होते. रविवारी त्याला न्यायालयापुढे हजर करून पोलिसांनी ३ सप्टेंबरपर्यंत कोठडी मागितली. यावर न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. याशिवाय विधीसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर केले. त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. यावेळी आरोपीच्या बाजूने अॅड. सलीम शाह यांनी युक्तीवाद केला.