आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेहावर ३ दिवसांनी अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:32 AM2018-04-13T05:32:04+5:302018-04-13T05:32:04+5:30
माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेल्या शंकर भाऊराव चायरे (५५ रा. राजूरवाडी, ता. घाटंजी) या शेतकºयाच्या मृतदेहाचे अखेर तीन दिवसांनंतर शवविच्छेदन होऊन रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले.
यवतमाळ : माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेल्या शंकर भाऊराव चायरे (५५ रा. राजूरवाडी, ता. घाटंजी) या शेतक-याच्या मृतदेहाचे अखेर तीन दिवसांनंतर शवविच्छेदन होऊन रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले. पालकमंत्री मदन येरावार आणि माजी खासदार नाना पटोले यांनी मध्यस्थी केल्यानंतर चायरे कुटुंबीयांनी उपोषण सोडले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही चायरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटुंबीयांनी घेतली होती. त्यामुळे गेले तीन दिवस मृतदेह येथील शवविच्छेदनगृहात पडून होता. मृताच्या कुटुंबीयांपैकी एकाला शासकीय नोकरी, कुटुंबाला एक कोटी रुपयांची तत्काळ मदत आदी मागण्या करण्यात आल्या. मृताची पत्नी, तीन मुली आणि मुलगा आकाश यांनी उपोषण सुरू केले होते. माजी खासदार नाना पटोले यांनी राजूरवाडी येथे जाऊन चायरे कुटुंबीयांना उपवास सोडण्याची विनंती केली.
तसेच यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मदन येरावार यांनी चायरे कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा राजूरवाडी येथे अंत्यसंस्कार पार पडले.