भूमिगत गटाराच्या कामाविषयी रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 10:06 PM2019-05-05T22:06:50+5:302019-05-05T22:07:40+5:30
येथील वाघापूर परिसराच्या संभाजीनगर भागात ड्रेनेजचे काम केले जात आहे. या कामाची पद्धत योग्य नसल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. गुणनियंत्रण विभागाकडून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वाघापूर परिसराच्या संभाजीनगर भागात ड्रेनेजचे काम केले जात आहे. या कामाची पद्धत योग्य नसल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. गुणनियंत्रण विभागाकडून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वैशालीनगर, माधवनगर, संभाजीनगर, रंभाजीनगर, रेणूकानगरी आदी भागात ड्रेनेजसाठी गुळगुळीत असलेले रस्ते खोदण्यात आले. एवढे करूनही होत असलेले ड्रेनेजचे काम भविष्यात अनेक समस्यांना जन्म देणारे ठरतील, असे आजचे चित्र आहे. ड्रेनेज बांधण्यापूर्वी काँक्रिट (बेड) टाकले गेले नाही. थेट विटा, गिट्टी आणि सिमेंटद्वारे टाके बांधण्यात आले. पुढील काळात याठिकाणी पाणी झिरपण्याची शक्यता आहे. आजूबाजूला नागरिकांचे जलस्रोत आहे. या जलस्रोताला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बांधकामाचा दर्जाही निकृष्ट आहे. क्युरिन नाममात्र केले जात आहे. त्यामुळे या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय खोदलेल्या रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोनही प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रकाश माळवी, जगन्नाथ शिरसाट, नीळकंठ पानजवार, नंदकिशोर जाधव, विठ्ठल विलायतकर, पंढरीनाथ काकरवार, नागेश दुधकोहळे, वसंतराव ढोले, विलासराव गोर्लेवार, महादेवराव हर्षे, बळीराम गोलाईत, रमेश शेलोटकर, सुरेश पांडे, आनंद काळबांडे, शंकरराव धुर्वे, मंगेश वड्डेवार, सुधाकर सामृतवार, भाऊराव डांगरे, पी.आर. पांडे, अभिजित बोरकर, एल.बी. गारसेलवार, एस.बी. केशववार आदी नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षºया आहेत. प्रसंगी त्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे.
वाहतुकीची कोंडी
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी झालेल्या खोदकामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. खोदकाम सात-सात दिवसपर्यंत बुजविले जात नाही. या परिस्थितीत नागरिकांना आपल्या घरापर्यंत पोहोचणेही कठीण होऊन बसते. या कामात तत्परता असावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.