यवतमाळ आगारावर एसटी कामगारांचा रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:15 PM2019-07-10T22:15:09+5:302019-07-10T22:15:34+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील कारभाराविषयी कामगारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यासोबतच विविध विषयांची सोडवणूक होत नसल्याने अखेर यवतमाळ आगार संयुक्त कृती समितीने १६ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील कारभाराविषयी कामगारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यासोबतच विविध विषयांची सोडवणूक होत नसल्याने अखेर यवतमाळ आगार संयुक्त कृती समितीने १६ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
आगारातील वाहनांची स्थिती अतिशय दयनीय आहे. वाहनात नियमानुसार आवश्यक साहित्य उपलब्ध राहात नाही. परिणामी मार्गात प्रवासी आणि चालक-वाहकांची गैरसोय होते. ड्यूटी अलोकेशनमध्ये मनमानी सुरू आहे. मर्जीतील मोजक्याच वाहतूक नियंत्रकांना नियमबाह्य पद्धतीने कामगिरी दिली जाते. इटीआय मशीन चार्जींग न करता वाहकांना दिल्या जातात. मार्गावर मशीन बिघडण्याचे प्रकार वाढले. याचा त्रास वाहकांना होतो.
आगारात चालक-वाहकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बडतर्फ चालकाचा आगारात हस्तक्षेप वाढला आहे. अलोकेशनमध्ये बसून कामगिरी लावून घेण्यापर्यंत त्यांचा हस्तक्षेप सुरू आहे. रजा नोंद रजिस्टर आगार व्यवस्थापकांच्या ताब्यात आहे. त्यावर प्रथम सात रकाने रिक्त ठेऊन त्यानंतर आलेल्या अर्जाच्या नोंदी घेतल्या जातात. वास्तविक आगारात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियमित रजेवर नसताना या रकान्यामुळे कर्मचाऱ्यांचे अर्ज रजा कोट्याबाहेर दर्शवून नामंजूर केले जात असल्याचा आरोप आहे.
रात्रवस्तीस फेºया घेऊन जाणाºया चालक-वाहकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाही. सोयी नसलेल्या ठिकाणी फेºया पाठवू नये, असे कामगारांचे मत आहे. मर्जीतील वाहतूक नियंत्रकांना एकच एक कामगिरी अलोकेशनला दिली जाते. इतर वाहतूक नियंत्रकांना चक्रकामगिरीच्या नावाखाली इतरत्र कामगिरी करायला सांगितले जाते. यामुळे याविषयी कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात एसटी कामगार संघटना, राष्ट्रीय मोटार कामगार युनियन, कास्ट्राईब राज्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), चालक-वाहक, यांत्रिक कामगार संघटना यवतमाळ आगाराने उपोषणाचा इशारा दिला आहे.
फिक्स ड्यूट्यांच्या नावाखाली मनमानी
फिक्स ड्यूटीच्या नावाखाली यवतमाळ आगारात मनमानी कारभार सुरू आहे. काही विशिष्ट लोकांना सवलती देऊन इतरांना मात्र जाणीवपूर्वक फेरफार करून त्रास दिला जातो. चांगले उत्पन्न देणाºया चालक-वाहकांवरही अविश्वास दाखवून फिक्स ड्यूटीच्या नावाखाली इतरत्र कामगिरी देऊन त्रास दिला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.