कोरोनाच्या संकटात कोवळ्या कळ्यांचे भविष्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 05:00 AM2021-04-24T05:00:00+5:302021-04-24T05:00:10+5:30
बहुतांश प्रकरणात माहिती मिळताच प्रशासनाने बालविवाह लागण्यापूर्वीच ते टाळले. मात्र १६ मार्च रोजी पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जंगल परिसरातील मंदिरात अल्पवयीन मुलीचा थेट लग्नसोहळाच पार पडला. या प्रकरणात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर नेरच्या मुकिंदपूरमधील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी प्रशासन तिच्या घरी धडकल्यावर मातापित्यांनी हमीपत्र लिहून दिले.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे प्रशासन व्यस्त आहे. खेड्यापाड्यातील अनेक घातक रुढी, परंपरांना त्यामुळे मोकळे रान मिळत आहे. त्याचाच गैरफायदा घेत जिल्ह्यात कोवळ्या वयाच्या मुलींचे थोराड युवकांशी लग्न लावून देण्याची लाट आली आहे. एकट्या एप्रिल महिन्यात तब्बल आठ बालविवाहांच्या घटना पुढे आल्या. कोरोनाची पहिली लाट थंडावल्यानंतर बालविवाहही थंडावल्याचे दिसले. मात्र फेब्रुवारीपासून कोरोनाही वाढू लागला अन् बालविवाहदेखील मोठ्या प्रमाणात ठरू लागलेत. प्रशासनाच्या कारवाईनंतरही बालविवाहांचे घाट घातले जात आहेत.गेल्या वर्षभरात तब्बल ३० बालविवाह उघड झाले. जे उघड होऊ शकले नाही, त्यांची तर गणतीच नाही. अज्ञान, गरिबी, बेरोजगारी अशी कारणे पुढे करीत अनेकजण बालविवाहांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुलगी हे परक्याचे धन मानून शक्य तेवढ्या लवकर तिला ‘उजविण्याचा’ प्रयत्न खुद्द जन्मदात्यांकडूनच केला जात आहे. इतर वेळी बालविवाह प्रतिबंध कायद्याचा धाक असतो. मात्र, सध्या संपूर्ण प्रशासन कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुरफटले आहे. दुर्गम खेड्यापाड्यातील लोक त्याचाच फायदा घेत लपूनछपून, तर कुठे उघडउघड अल्पवयीन मुलींचे विवाह करीत आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात असे तब्बल आठ बालविवाह जिल्हा बालसंरक्षण कक्षाने चव्हाट्यावर आणले. मात्र, अद्यापही हा प्रकार थांबायचे नाव घेताना दिसत नाही.
खंडाळा, घाटंजीत दोन प्रकरणात गुन्हे
बहुतांश प्रकरणात माहिती मिळताच प्रशासनाने बालविवाह लागण्यापूर्वीच ते टाळले. मात्र १६ मार्च रोजी पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जंगल परिसरातील मंदिरात अल्पवयीन मुलीचा थेट लग्नसोहळाच पार पडला. या प्रकरणात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर नेरच्या मुकिंदपूरमधील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी प्रशासन तिच्या घरी धडकल्यावर मातापित्यांनी हमीपत्र लिहून दिले. मात्र प्रशासन परत जाताच पुन्हा लग्नाची तयारी केली अन् अवघ्या चार दिवसातच घाटंजी तालुक्यात जाऊन लग्नसोहळा पार पाडला. याही प्रकरणात घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कोरोनाच्या एक वर्षात अमरावती विभागात प्रशासनाने तब्बल ७२ बालविवाह उघडकीस आणून रोखले. त्यात विभागातील पाचही जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२ बालविवाह रोखले गेले. वाशिमध्ये १२, बुलडाणा २१, अमरावती १२ तर अकोला जिल्ह्यात ५ बालविवाह रोखले गेले. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात मार्चनंतरही बालविवाहांचा सपाटा सुरूच आहे. मार्चनंतर अवघ्या महिनाभरात तब्बल ८ बालविवाहांच्या घटना पुढे आल्या.
आणखी तीन कारवाया प्रशासनाच्या टप्प्यात
कोरोनाच्या निर्बंधाआडून अत्यल्प खर्चात मुलीचे लग्न लावून देता येईल, या घाईतून बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय अल्पवयातील प्रेमप्रकरणेही कारणीभूत ठरत आहे. मात्र आपण गाव बालसंरक्षण समित्यांच्या कार्यशाळा घेतल्याने या समित्या जागृत झाल्या आहे. यावर्षीच्या कारवायांचे प्रमाण गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आहे. कळंब, मारेगाव आणि बाभूळगाव तालुक्यातील आणखी तीन बालविवाहांची माहिती आली असून लवकरच कारवाई केली जाईल. - देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी