गदिमायन : संमेलनात गदिमांच्या रचनांची अनोखी मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 09:27 PM2019-01-12T21:27:28+5:302019-01-12T21:27:57+5:30
प्रसिद्ध कवी ग. दिं. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी सकाळी ‘गदिमायन’ हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : दूर सर्व राहिले
दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवे
सूर दाटले मुखी
अशा रचनांनी ‘गदिमायना’ने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध कवी ग. दिं. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी सकाळी ‘गदिमायन’ हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे, १९७३ मध्ये यवतमाळात झालेल्या ४९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे गदिमाच अध्यक्ष होते. तर आता २०१९ मध्ये यवतमाळातच ९२ वे संमेलन होत असताना गदिमांची जन्मशताब्दी आहे. हा योगायोग साधून माडगूळकरांच्या रचनांची वेगळ्या ढंगात रसिकांना मेजवानी देण्यात आली.
गदिमांच्या कविता, लेख यांचे सादरीकरण करण्यात आले. तर माडगूळकरांनी लिहिली गीते आणि त्याला सुधीर फडकेंनी दिलेले स्वर यांचा मेळ साधण्यात आला. त्याचवेळी पु. लं. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्तही काही रचना पेश करण्यात आल्या. गीतरामायणाने या कार्यक्रमाला खरा बहर आला.
‘अद्वैत’ ही गदिमांची कविता रसिकांना अंतर्मुख करून गेली. ‘खिडकीतून मी डोकावले.. हसऱ्या स्वराने तो एक श्लोक गात होता. दोन्हीतले एक सत्य असले पाहिजे. मी दास नाही किंवा माझी उपेक्षा झाली नाही. मग शय्येशी खेळले ते कोण? शरीर. दु:ख भोगत होता तो कोण? देह. मग मी कोण? समोर खिडकी नाही वेड्या तो आरसा आहे. मी दास नाही मी रामच आहे...’ ही रचना ऐकताना गदिमांच्या शब्दातले संतत्व भारावून टाकणारे होते.
नवीन आज चंद्रमा
नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना
नवेच स्वप्न लोचनी
ही गदिमांचे सुमधुर गीत यावेळी सादर करण्यात आले. ते रसिकांच्या मनात मुरत गेले. ‘हॅलो मीस्टर डेन’ हा लेख तर सर्वांना भावूक करून गेला. ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि पु. लं. देशपांडे या तिघांचीही राजकीय विचारदृष्टी एकमेकांपासून भिन्न होती. मात्र तिघांचीही दृष्टी मानवी कल्याणाची होती. तिघेही शेवटपर्यंत माणसांच्या गोतावळ्यातच राहिले, अशा शब्दात या मैफलीचा समारोप करण्यात आला. यावेळी अपर्णा केळकर यांनी गायन केले. तर काव्यवाचन अक्षय वाटवे आणि गौरी देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी होत्या.
दुसऱ्या दिवशीही निषेध सत्र
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. संमेलनाचा पहिला दिवसही निषेधानेच सुरू झाला. शनिवारच्या पहिल्या सत्रात ‘गदिमायन’ ग.दि. माडगूळकर यांच्या साहित्यसंपदेचा वेध घेणारा संगीतमय कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरू झाला. यात समन्वयक डॉ. वंदना बोकील, गायक अपर्णा केळकर, काव्य वाचक अक्षय वाटवे आणि गौरी देशपांडे यांनी काळ्याफिती बांधून आपला निषेध नोंदविला