गडकरींचा प्रवास केंद्रापर्यंत, पूल मात्र भूमिपूजनावरच
By admin | Published: October 16, 2015 02:13 AM2015-10-16T02:13:37+5:302015-10-16T02:13:37+5:30
राज्याचे बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी भूमिपूजन केलेल्या पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नाही.
हरिओम बघेल आर्णी
राज्याचे बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी भूमिपूजन केलेल्या पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नाही. गडकरी केंद्रात भूपृष्ठ वाहतूक मंत्री झाले. मात्र अडाण नदीवर आजही भूमिपूजनाचा फलकच कायम आहे. १६ वर्षानंतरही या पुलाचे बांधकाम सुरू झाले नसल्याने गावकऱ्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळचे अंतर कमी करणारा हा पूला केव्हा होणार असा प्रश्न आर्णी तालुक्यातील म्हसोला परिसरातील नागरिकांना पडला आहे.
आर्णी तालुक्यातील म्हसोला आणि रूई दरम्यान अडाण नदी वाहते. या नदीवर पूल झाल्यास यवतमाळचे अंतर २० किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांचीही सोय होणार आहे. त्यामुळेच राज्यात युतीची सत्ता असताना पूल बांधण्याचा प्रस्ताव आला. पुलाचे भूमिपूजन करण्याचे ठरले. ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन करण्याचे निश्चित झाले. भूमिपूजनासाठी फलक लावण्यात आला. ना.गडकरी गावात येणार म्हणून जवळा गावाजवळून म्हसोलापर्यंत ताबडतोब रस्ताही करण्यात आला. रात्रीच्या वेळी येऊन ना. गडकरी यांनी भूमिपूजन केले. आता अडाण नदीवर पूल निश्चितच होणार अशी भाबडी आशा म्हसोला, पांगरी, पहूर, शकलगाव, अंजी, भांबोरा या गावातील नागरिकांना लागली होती. शेकडो गावकरी त्यावेळी भूमिपूजनाला उपस्थित होते. मात्र भूमिपूजनानंतर बांधकामाला सुरुवातच झाली नाही. युतीच्या काळात बांधकामासाठी निधी आला नाही. त्यामुळे म्हसोलाचे तत्कालीन उपसरपंच भास्कर राऊत यांनी लोकशाही दिनात पाठपुरावा केला. तत्कालीन अधीक्षक अभियंत्याने राऊत यांना एक पत्र दिले. त्या पत्रात सदर काम अर्थसंकल्पात समाविष्ठ असून निधीअभावी काम प्रलंबित आहे. निधी उपलब्ध होताच काम हाती घेण्यात येईल, असे म्हटले.आता याही पत्राला १५ वर्ष होऊन गेले. मात्र पुलाच्या बांधकामाला प्रारंभ झाला नाही. ना.नितीन गडकरी राज्यातून केंद्रात गेले. केंद्रात भूपृष्ठ वाहतूक मंत्री झाले. परंतु त्यांनी भूमिपूजन केलेला पूल आजही बांधकामाच्या प्रतीक्षेतच आहे. आता पुन्हा राज्यात युतीची सत्ता आली आहे. त्यामुळे आता तरी हा पूल व्हावा, अशी अपेक्षा आहे.