जिल्हा बँकेत महाविकास आघाडी फोडण्याची खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 05:00 AM2020-12-29T05:00:00+5:302020-12-29T05:00:37+5:30
अध्यक्षपदासाठी प्रकाश देवसरकर, मनीष पाटील, वसंत घुईखेडकर, राजूदास जाधव, अनुकूल चव्हाण अशी काही नावे चर्चेत आहेत. मात्र, या बहुतांश नावांना विरोध आहे. सर्वसंमतीने एकमत या नावांबाबत होण्याची चिन्हे नाहीत. मनीष पाटील यांनी १३ वर्षांपैकी अर्धा अधिक काळ बँकेचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या काळात लिपिक पदांची नोकरभरतीही गाजली.
राजेश निस्ताने
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी संचालकांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. बँकेतील महाविकास आघाडीच्या एकजुटीला सुरुंग लावून वेगळेच समीकरण ऐनवेळी जुळविण्याची व्यूहरचना केली जात आहे. त्यात यश आल्यास महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का राहणार आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी तब्बल १३ वर्षांनी निवडणूक घेण्यात आली. त्यात २१ पैकी सर्वाधिक १६ जागा महाविकास आघाडीने पटकावल्या. तीन जागांवर भाजप समर्थित तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आता ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १ वाजता बँकेत निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा असल्याने त्यातीलच कुणी अध्यक्ष होईल, असे मानले जात आहे. त्यातील काही चेहऱ्यांनी आपल्या परीने मोर्चेबांधणीही चालविली आहे. मात्र, महाविकास आघाडीत फूट पाडून वेगळेच समीकरण जुळविण्याचे प्रयत्न होत आहेत.
चर्चेतील नावांवर एकमताचे आव्हान
अध्यक्षपदासाठी प्रकाश देवसरकर, मनीष पाटील, वसंत घुईखेडकर, राजूदास जाधव, अनुकूल चव्हाण अशी काही नावे चर्चेत आहेत. मात्र, या बहुतांश नावांना विरोध आहे. सर्वसंमतीने एकमत या नावांबाबत होण्याची चिन्हे नाहीत. मनीष पाटील यांनी १३ वर्षांपैकी अर्धा अधिक काळ बँकेचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या काळात लिपिक पदांची नोकरभरतीही गाजली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत बँकेला त्यात लढा द्यावा लागला. त्यानंतर मनीष पाटील यांच्याविरोधात २३ संचालकांनी उघड भूमिका घेऊन अविश्वास दर्शविला होता. त्यामुळे त्यांना बाजूला केले गेले. नंतर निवडणूक घेतली गेली. त्यात अमन गावंडे निवडून आले. त्यावेळी वसंत घुईखेडकर हेसुद्धा अध्यक्षपदाचे उमेदवार होते. मात्र, त्यांना बँकेच्या संचालकांनी नाकारले. त्यामुळे घुईखेडकरांना तसेच मनीष पाटलांंना अध्यक्ष म्हणून बँकेचे संचालक पुन्हा स्वीकारतील का, याबाबत साशंकता आहे. राष्ट्रवादीतील एक गट घुईखेडकरांच्या विरोधात असून ते थेट वरच्या स्तरावरून फिल्डींग लावण्याची शक्यता आहे. देवसरकर, राजूदास जाधव यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता नाही. काही घटकांकडून त्यांच्या नावाला विरोध होऊ शकतो.
चावी चव्हाणकडे देण्यास विरोध
पुसदमधील अनुकूल विजय चव्हाण हे एक नवे नाव पुढे येत आहे. मात्र, बँकेचा कोणताही अनुभव त्यांच्या पाठीशी नाही. विजय चव्हाण यांच्या बँक अध्यक्षपदाच्या कार्यकाळातही गाजलेले घोटाळे सर्वश्रुत आहेत. साहित्य खरेदीत त्यावेळी बँकेला पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा बँकेच्या तिजोरीची चावी चव्हाण यांच्या घरात देण्यास संचालकांचा विरोध आहे. अलीकडेच राबविलेल्या नोकरभरतीत विजय चव्हाण यांनी पडद्यामागून जोरदार हालचाली केल्या. थेट दिल्लीपर्यंत कागदपत्रे हलविली. त्यामुळेसुद्धा चव्हाण यांच्यावर बँकेच्या वर्तुळात रोष पहायला मिळतो.
रिपीट उमेदवार, घराणेशाहीला विरोध
एकूणच बँकेत रिपीट उमेदवार, घराणेशाही, नेते मंडळींच्या घरात वारसदारी या प्रकारांना तीव्र विरोध पहायला मिळतो आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांभाळण्यासाठी अनुभवी, वजनदार चेहरा हवा असा सर्वसमावेशक सूर आहे. चुकीच्या व्यक्तीच्या हातात बँक दिल्यास यवतमाळ जिल्हा बँक बुलडाणा, वर्धा बँकेच्या रांगेत जाण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच, एखाद्या ह्यदूरदृष्टीह्णच्या कणखर नेतृत्वाच्या हाती बँकेच्या तिजोरीची चावी द्यावी, असा काही संचालक व बँकेच्या यंत्रणेचाही सूर आहे. त्यातूनच बँकेत जोडतोड करून नवे समीकरण जुळविण्याच्या हालचाली केल्या जात आहेत.
राजकीय ह्यचेकमेटह्ण, एककल्ली कारभाराला ह्यब्रेकह्ण
ल्ल बँक अध्यक्षपदाच्या माध्यमातून ह्यस्थानिक सरकारह्णला राजकीय ह्यचेकमेटह्ण देण्याचा, महाविकास आघाडी असूनही एककल्ली कारभार चालविण्याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यासाठी भाजपचा पुढाकार आहे. त्यांना अपक्ष व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची साथ लाभणार असल्याचे सांगितले जाते. जिल्हा बँक अध्यक्ष पदासाठीच्या या नव्या खेळात कोण-कोण संचालक सहभागी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीत फोडाफोडी करून जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अचानक अनपेक्षित परंतु अनुभवी, वजनदार चेहरा रिंगणात उतरविण्याची ही खेळी कितपत यशस्वी होते, याकडे नजरा लागल्या आहेत.
वणी, आर्णी, पुसद मतदारसंघातून संख्याबळ जुळविण्याचा प्रयत्न
ल्ल विधानसभेच्या वणी, आर्णी, पुसद मतदारसंघातून ही जुळवाजुळव केली जात असून आर्णी व पुसदच्या मध्यात त्याचा केंद्रबिंदू ठेवला जात आहे. अपक्ष, भाजप यांना एकत्र आणून महाविकास आघाडीतील काही संचालकांना जाळ्यात ओढण्याची रणनीती खेळली जात आहे. या माध्यमातून अध्यक्षपदासाठी लागणाऱ्या ११ ऐवजी त्याच्याही पुढचा सुरक्षित आकडा गाठण्याचे प्रयत्न आहेत.