शेतकरी कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ची गांधीगिरी
By admin | Published: April 22, 2017 01:43 AM2017-04-22T01:43:43+5:302017-04-22T01:43:43+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आसूड यात्रा निघाली.
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आसूड यात्रा निघाली. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी येथे शुक्रवारी बसस्थानक चौकात ‘आमचे रक्त घ्या, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’, असे म्हणत रक्तदान केले.
येथील बसस्थानक चौकात प्रहारच्या नेतृत्वात गांधीगिरीला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून शेतकऱ्यांचे रक्त ओढू नका, आमचे रक्त घ्या, अशा घोषणा करीत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नंतर तेथेच काही कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. कार्यकर्त्यांनी प्रथम पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर रक्तदान करण्याची परवानगी पोलिसांना मागितली. त्यांची मागणी पोलिसांनी धुडकावली. तसेच शासकीय रूग्णालयालाही त्यांचे रक्त घेण्यास नाकारले. यामुळे आंदोलनकर्ते संतापले. त्यांचे उग्ररूप बघून अखेर वैद्यकीय महाविद्यालयाने ४ वाजता रक्तदानाचा आग्रह मान्य केला. त्यानंतर रवि राऊत, सुभाष कुळसंगे, प्रज्ञा कुळसंगे, कार्तिक चौधरी, अमित गावंडे, हंसराज सोमवंशी, आशिष तुपटकर, राज महाजन, नीतेश ठाकरे, दर्शन भारती, निरज काळे, दुर्गेश नवलकर, आकाश चिंचोळकर, आकाश सोमवसे आदींनी रक्तदान केले. (शहर वार्ताहर)