युवक काँग्रेसची पालिकेत गांधीगिरी
By admin | Published: July 13, 2017 12:16 AM2017-07-13T00:16:14+5:302017-07-13T00:16:14+5:30
शहरातील स्वच्छतेची समस्या घेऊन बुधवारी दुपारी युवक काँग्रेसने नगरपालिकेत धडक दिली.
‘सीओं’च्या खुर्चीला हार : नगराध्यक्षांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील स्वच्छतेची समस्या घेऊन बुधवारी दुपारी युवक काँग्रेसने नगरपालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदविला.
शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवित भाजपा-शिवसेना पालिकेत सत्तेत बसले. मात्र दिलेल्या आश्वासनापैकी एकाचीही पूर्तता करण्यात आली नाही, असा आरोप युवक काँग्रेसने केला. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम नगरपरिषदेत सुरू असून सत्ताधारी भाजपाने शहरात केवळ विकास कामे झाल्याचा कांगावा सुरू केला. प्रत्यक्षात भयाण स्थिती असून मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्नही निर्माण झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरील ऐतिहासिक आझाद मैदान डम्पींग ग्राऊंड बनले. तेथे सर्वत्र कचरा पसरलेला आहे. तेथे जयस्तंभ, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांचे पुतळे आहे. या परिसराचीही स्वच्छता होत नाही, अशा समस्यांचे निवेदन युवक काँग्रेसने नगराध्यक्ष कांचन चौधरी यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्की राऊत, काँग्रेस नगरसेवक बबलू देशमुख, विशाल पावडे, शहजाद शाह, छोटू सवाई, कृष्णा पुसनाके, शुभम लांडगे, अक्षय गिरी, श्याम खडसे, दत्ता हाडके, ललित जैन, अतुल रत्नपारखी, सुवेध भेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.