गणेशोत्सव तोंडावर, तरीही यवतमाळात रस्त्यांची चाळणी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 09:56 PM2018-08-28T21:56:40+5:302018-08-28T21:58:39+5:30
सर्वांना प्रतीक्षा असलेला गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र यावेळी रस्त्यांवरील खड्डे चुकवित गणरायाला आगमन करावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वांना प्रतीक्षा असलेला गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र यावेळी रस्त्यांवरील खड्डे चुकवित गणरायाला आगमन करावे लागणार आहे. कारण यवतमाळ शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळणी झाली आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या वर्चस्वाच्या राजकारणात शहराची पूर्णत: वाट लागली आहे. पालिकेत बांधकाम विभाग अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका येऊ लागली आहे.
यवतमाळात दुर्गोत्सवाचे महत्व असले तरी गणेशोत्सवही तेवढ्याच हर्षोल्हासात साजरा केला जातो. ग्रामीण भागातही अनेक सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशाची स्थापना केली जाते. घरोघरीही श्री गणेश विराजमान होतात. दरवर्षी सार्वजनिक मंडळांची संख्या वाढते आहे. १३ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते या उत्सवाच्या तयारीलाही लागले आहे. परंतु त्यांना गणरायाचे आगमन कसे होणार याची चिंता भेडसावते आहे. कारण शहरातील रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. कुठे जीवन प्राधिकरणाने तर कुठे दूरसंचार विभागाने रस्ते खोदले आहे. काही ठिकाणी विकास कामाच्या नावाखाली रस्त्यांचे खोदकाम झाले आहे. तर अनेक रस्त्यांवर कोणतेही कारण नसताना खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांसाठी त्या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जा हे प्रमुख कारण ठरले आहे. अशा रस्ते व खड्ड्यांची संख्या अधिक आहे. विकास कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या आड हे भ्रष्टाचारामुळे पडलेले खड्डेही दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. या खड्डेयुक्त रस्त्यांवरुनच गणरायाचे आगमन करावे लागणार का या चिंतेत कार्यकर्ते आहेत. हे खड्डे असेच राहिल्यास गणरायालासुद्धा हे खड्डे चुकवित आगमन करावे लागणार आहे. या खड्ड्यांमुळे दहा दिवस गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान कार्यकर्त्यांपुढे राहणार आहे.
या रस्त्यांवरील खड्ड्यांना यवतमाळ नगरपरिषदेचे राजकारण प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत तर बहुमत भाजपाचे आहे. मोठी विकास कामे झाल्यास सेनेला श्रेय मिळेल म्हणून शक्य असेल तेथे अडथळे निर्माण करण्याचा व सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा नगराध्यक्षांचा सूर आहे. तर नगराध्यक्षच विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याचा भाजपाचा आरोप आहे. मात्र या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या राजकारणात यवतमाळकर नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतो आहे. शहराचे हृदयस्थळ असलेल्या दत्त चौकातच मुख्य मार्गाला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यावरून शहरातील अन्य मार्ग आणि नव्याने समाविष्ठ जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती काय असेल याची कल्पना येते.
आधीच खड्डे त्यात पाऊस आल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अनेकांच्या गाड्या स्लीप होऊन हातपाय फ्रॅक्चर झाले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांना पाठीचे, मणक्यांचे आजार वाढले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी अजूनही नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडून पाहिजे त्या गतीने प्रयत्न होताना दिसत नाही. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करता येत नाहीत हा नियम आवर्जुन या विभागाकडून सांगितला जातो. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी लाल मुरुम टाकला गेला आहे. मात्र पावसात कुठे तो वाहून गेला तर बहुतांश ठिकाणी या मुरुमामुळे रस्त्याची स्थिती आणखी बिघडली आहे. मुरुमामुळे मोठ्या प्रमाणात वाहने कोलमडू लागली आहे. श्री गणरायाचे आगमन अशा खड्डेयुक्त रस्त्यांमधूनच करायचे काय? असा सवाल गणेशभक्तांकडून नगरपरिषदेला विचारला जात आहे.
सर्वत्र भाजपाचीच सत्ता, तरीही वाताहत
यवतमाळ पालिकेवर भाजपाची सत्ता आहे, शहराचे आमदार भाजपाचे आहे, आणखी त्यांच्याकडे राज्यमंत्री पद व पालकमंत्री पदही आहे. त्यानंतरही यवतमाळ शहर खड्डेमय झालेले पहावे लागत असेल तर या भाजपाच्या सत्तेचा यवतमाळकरांना उपयोग काय असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.
गणराया, पालिकेला खड्डे बुजविण्याची सद्बुद्धी द्या
किमान गणरायाच्या आगमनापूर्वी तरी हे खड्डे बुजविण्याची सद्बुद्धी यवतमाळ नगरपरिषदेचे पदाधिकारी, प्रशासन आणि विशेषत: बांधकाम विभागाला सूचते का? याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.