विवाहितेवर सामूहिक अत्याचार; सर्व आरोपींना अटक
By रवींद्र चांदेकर | Published: May 19, 2023 06:52 PM2023-05-19T18:52:40+5:302023-05-19T18:53:30+5:30
दारव्हा तालुक्यातील एका गावात सहाजणांनी विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. ही घटना ११ मे रोजी घडली. या घटनेतील सर्व सहाही आरोपींना लाडखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रवींद्र चांदेकर
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील एका गावात सहाजणांनी विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. ही घटना ११ मे रोजी घडली. या घटनेतील सर्व सहाही आरोपींना लाडखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लाडखेड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात ३५ वर्षीय विवाहित महिला पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. विवाहितेचे पती मागील तीन वर्षांपासून एका शेतकऱ्याचे १२ एकर शेत मक्त्याने करतात. विवाहिता शेतमजुरीची कामे करते. ११ मे रोजी सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास विवाहिता पतीने मक्त्याने केलेल्या शेतात कामासाठी गेली होती. दुपारी १:०० वाजताच्या सुमारास गजानन रामराव लव्हाळे (४०), पंजाब केशव सोनपिपरे (४०), विठ्ठल रामराव लव्हाळे (३५), विनायक गोविंदा वासनिक (५०), राजू दादाराव घुगे (३०) आणि राहुल रमेश जायभाये (२५) हे सर्व तिच्या शेतामध्ये गेेले. त्यापैकी गजानन लव्हाळे याने विवाहितेला उचलून शेताच्या धुऱ्यावर नेले. त्याच्या मागे इतर पाच आरोपी होते. गजाननने धुऱ्यावरील नालीमध्ये नेवून तिच्यावर जबरीने अत्याचार केला.
विवाहितेने स्वत:ला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तिची शक्ती कमी पडली. त्यानंतर इतर पाचजणांनीही तिच्यावर आळीपाळीने जबरीने अत्याचार केला. घडलेली घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यातून सावरत विवाहिता कशीबशी घरी परतली. तिने चक्क चार दिवस या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र, पतीने धीर दिल्याने तिने अखेरीस १८ मे रोजी लाडखेड पोलिस ठाणे गाठून सहाजणांविरूद्ध अत्याचार केल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सहाही जणांविरूद्ध भादंवि ३७६ (डी), ५०६ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
लाडखेडचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे यांनी त्वरित गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. एसडीपीओंनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना विविध सूचना दिल्या. ठाणेदार रामकृष्ण भाकडे, मोरेश्वर सावदे, उमेश शर्मा आणि पोलिस पथक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास करीत आहेत.