नवजात बाळाची  विक्री करणारी टोळी स्टिंग ऑपरेशन करून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 07:24 PM2021-10-01T19:24:37+5:302021-10-01T19:26:18+5:30

Yawatmal News ‘बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे’ असा मेसेज व्हायरल झाल्यापासून ३६ तासांत स्टिंग ऑपरेशन करून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील २१ दिवसांच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली.

A gang selling newborn babies arrested by sting operation | नवजात बाळाची  विक्री करणारी टोळी स्टिंग ऑपरेशन करून जेरबंद

नवजात बाळाची  विक्री करणारी टोळी स्टिंग ऑपरेशन करून जेरबंद

Next
ठळक मुद्दे यवतमाळ व अकोला महिला बाल कल्याण विभागाची संयुक्त कारवाई

यवतमाळ : ‘बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे’ असा मेसेज व्हायरल झाल्यापासून ३६ तासांत स्टिंग ऑपरेशन करून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील २१ दिवसांच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली. विशेष म्हणजे बाल कल्याण समिती अध्यक्ष यांनी स्वतः डमी पालक बनून ही घटना पुढे आणली. अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत गुरुवारी रात्री बाळालाही ताब्यात घेतले. यापकरणी शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली. (A gang selling newborn babies arrested by sting operation)

“बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे, निसंतान लोकांनी संपर्क साधावा,” असा संदेश व्हायरल होत होता. सदर मेसेज अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी वाचल्यावर त्यांनी खात्री करण्यासाठी डमी पालक म्हणून मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केला असता आर्थिक लाभाच्या लालसेने वणी येथील रहिवासी महिला बाळ देण्यास तयार झाली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आणि महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी स्टिंग ऑपरेशनची कार्यवाही करण्याचे नियोजन केले. या अधिकाऱ्यांनी स्वतः डमी पालक बनून बाळ ताब्यात घेऊन व्यवहार केल्याचा यावेळी बनाव केला व इशारा मिळताच पोलीस पथकाने धाड टाकून २१ दिवसांच्या नवजात मुलीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीस ताब्यात घेऊन कारवाई केली.

 

या प्रकरणातील मध्यस्थी महिला ही वणी येथे बेटी फाउंडेशन नावाने संस्था चालवत असून तिने त्याच परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात चौथी मुलगी झाली व कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने त्याचा फायदा घेत पालकांना बाळ देण्याकरिता प्रवृत्त केले. सदर कारवाई यवतमाळचे बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. सुनील घोडेस्वार, अकोलाच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, यवतमाळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, अकोलाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, यवतमाळचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्यासह गजानन जुमळे, रवींद्र गजभिये, वनिता शिरफुले, पोलीस निरीक्षक बबन कराळे, सहा. पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे आदींनी पुढाकार घेऊन केली.

या सहा जणांना केली अटक

याप्रकरणी प्रीती कवडू दरेकर (२८), कवडू गजानन दरेकर (३०), गौरी गजानन बोरकुटे (३५), मंगला किशोर राऊत (४४), सुनील महादेव डहाके (३५) आणि पंचफुला सुनील डहाके (३१), सर्व रा. रंगनाथनगर, वणी या सहा जणांविरुद्ध भा.दं.वि. ३७० व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ८१ व ८७ अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने बाळाला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

Web Title: A gang selling newborn babies arrested by sting operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.