तरुणांचे वय वाढवून देणारी टोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 09:58 PM2019-08-01T21:58:04+5:302019-08-01T21:58:55+5:30
वयोवृद्ध नसतानाही ज्येष्ठ नागरिकांची प्रवास सवलत लाटणाऱ्यांना चाप लावण्यासाठी एसटीने स्मार्ट कार्ड योजना आणली. स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठीही काही महाभागांनी चक्क आधार कार्डावरील आपले वय वाढवून घेतल्याची बाब पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वयोवृद्ध नसतानाही ज्येष्ठ नागरिकांची प्रवास सवलत लाटणाऱ्यांना चाप लावण्यासाठी एसटीने स्मार्ट कार्ड योजना आणली. स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठीही काही महाभागांनी चक्क आधार कार्डावरील आपले वय वाढवून घेतल्याची बाब पुढे आली आहे. अशा बनवेगिरीतून मिळविलेले साडेचारशे स्मार्ट कार्ड राज्य परिवहन महामंडळाने रद्द केले आहे. तरुणांना ज्येष्ठाचे आधार कार्ड पुरविणारी टोळी सक्रीय असून टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी यवतमाळ आगाराने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली आहे.
राज्य परिवहन महामंडळाने वृद्ध नागरिकांना प्रवास सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. ६५ वर्षांवरील नागरिकांनाच ही सवलत लागू आहे. दरवर्षी चार हजार किमीचा प्रवास अर्ध्या तिकीट दरात करता येणार आहे. त्यासाठी ज्येष्ठांच्या कार्डाचे अद्ययावतीकरण सुरू झाले आहे. हे कार्ड मिळावे म्हणून जिल्ह्यातील १२ तालुक्यांत अशी व्यवस्था करण्यात आली. कार्ड गोळा करताना आधार कार्डवरील माहिती आणि आॅनलाईन माहितीमध्ये तफावत आढळत आहे. अशा नागरिकांचे ज्येष्ठत्वाचे कार्ड एसटीने रद्द केले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक नियंत्रकांनी या बाबीचा शोध घेतला. त्यात असे कार्ड बनवून देणारी टोळी असल्याचे निदर्शनास आले आहे. ही टोळी गरजू नागरिकांना हेरते आणि ज्येष्ठाचे कार्ड काढून देण्यासाठी आधार कार्डावर वय वाढवून देते. आॅनलाईन तपासातून हा प्रकार उघड झाला आहे. बनावट कार्डमुळे खºया गरजू ज्येष्ठ नागरिकांवर मात्र अन्याय होण्याची शक्यता आहे.
आधार संकेतस्थळानंतरच शिक्कामोर्तब
स्मार्टकार्ड योजनेत आधार कार्डाच्या संकेतस्थळावरील माहिती वापरली जाते. त्यासाठी दररोज आॅनलाईन नोंदणी घेतली जाते. आधारकार्ड आणि संकेतस्थळावरची माहिती पडताळूनच स्मार्टकार्ड पुरविले जाते. आधार संकेतस्थळाच्या गतीवरच स्मार्ट कार्डचे अर्ज स्वीकारले जातात. यासाठी एका केंद्राची क्षमता दर दिवसाला ५० ते ६० कार्डांची आहे. प्रत्यक्षात क्षमतेपेक्षा अधिक वयोवृद्ध येत असल्याने गोंधळ उडतो. अर्जाची नोंदणी केल्यावर दोन महिन्यानंतर स्मार्ट कार्ड वृद्धांना मिळणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची स्मार्टकार्ड योजना बोगस कार्डाला आळा घालण्यासाठी आहे. कुणालाही मोफत प्रवास मिळणार नाही. असे बोगस कार्ड रद्द करण्यात आले आहे. त्याची तक्रार स्थानिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली आहे.
- कुणाल चौधरी,
स्मार्ट कार्ड कक्ष, वाहतूक नियंत्रक