बाळापूर येथे गॅस्ट्रोचा उद्रेक
By admin | Published: July 12, 2017 01:05 AM2017-07-12T01:05:32+5:302017-07-12T01:05:32+5:30
वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून
६० जणांना बाधा : ३० रुग्णांवर वणीत उपचार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गावातील सुमारे ६० जणांना या आजाराची बाधा झाली असून त्यातील ३० जणांवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित ३० जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. गावात गॅस्ट्रोची लागण झालयने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक गावातील काही नागरिकांना उलटी, मळमळ व हगवणीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने कायर येथील एका खासगी डॉक्टरला उपचारासाठी बाळापुरात पाचारण करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहून सोमवारी दुपारी गावातील ३० गंभीर रुग्णांना दुपारी १२ वाजता मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने दुपारी २ वाजताच्या सुमारास या सर्व रुग्णांना वणी येथे आणण्यात आले. यांपैैकी २२ रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून आठजण शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. दूषित पाण्यामुळेच गावकऱ्यांना गॅस्ट्रोची बाधा झाल्याचे ते म्हणाले.
राम गिरी (७०), रघुनाथ चिंचोळकर (७०), मिरा बोंडे (५०), मंगला पायघन (३०). सुनिता बुच्चे (३०), विमल भोयर (५०), देवी पानघाटे (४५), मंगला वाघाडे (१०), पौैर्णिमा वाघाडे (१७), चंद्रकला मत्ते (४५), मंगला बोंडे (३५), मिरा पिंगे (५५), कोमल बोंडे (१७), पिंकी पंधरे (१७), संतोषी कोडापे (१६), सुरेखा हनुमंते (३५), रेखा ढेंगळे (१५), कौैशल्या ढेंगळे (१०), गौैरव पंधरे (२२), मधुकर हनुमंते (५०), सुनिल पिंगे (५५), मोहन पानघाटे (४०) यांच्यावर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संदीप उपरे (२५), शारदा उपरे (४०), भावना संदीप उपरे (२२), पल्लवी मोहारे (१७), अनिल मोहारे (४०), सुनिता मोहारे (३२), पौैर्णिमा मोहारे (१७), मयूर मोहारे (१४) यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाळापुरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आला. त्यानंतर सदर हातपंपाजवळ पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावला. मात्र त्यानंतरही नागरिकांनी पाण्याचा वापर पिण्यासाठी केला.
- विलास नैताम, सरपंच बाळापूर (बोपापूर)
हातपंपाचे पाणी दूषित
बाळापूर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खताचे ढिगारे उभे आहेत. वॉर्ड क्रमांक ३ मधील हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा फलक लावल्याचा दावा सरपंचांनी केला असला तरी हा दावा खोटा असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.