गहुली येथे अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोचा फैलाव, २० ते २५ जणांना लागण, उपचार सुरू
By अविनाश साबापुरे | Published: June 5, 2023 05:36 PM2023-06-05T17:36:28+5:302023-06-05T17:38:20+5:30
माजी मुख्यमंत्र्यांचे गाव
पुसद (यवतमाळ) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांचे मूळगाव असलेल्या गहुली येथे सार्वजनिक विहिरीचे दूषित पाणी पिल्याने २० ते २५ आबालवृद्धांना गॅस्ट्रोची लागण झाली.
दूषित पाणी पिल्यामुळे चिमुकल्यांसह प्रौढांना पोटदुखी, उलटी हा त्रास सुरू झाला. ज्या गावाने महाराष्ट्राला दोन कर्तबगार मुख्यमंत्री दिले, त्याच गहुली गावात आज नागरी सुविधांचे तीनतेरा वाजलेले आहे. वास्तविकता सत्ताधारी भाजपचे विधानपरिषद आमदार निलय नाईक हे अजूनही गावात वास्तव्य करीत असतात. मात्र ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे सदर परिस्थिती उद्भवली आहे.
वास्तविकता या गावात प्राथमिकतेने सर्व शासकीय योजना सोयीसुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या अवतीभोवती सांडपाण्याच्या निचरा होत आहे. सार्वजनिक विहिरीजवळ गावातील महिला कपडे धुतात. तेच घाण पाणी सार्वजनिक विहिरीत विलीन होते.
आरोग्य केंद्रात डाॅक्टर नाही, ग्रामसेवक गावात येत नाही
मागील तीन दिवसापासून विहिरीचे पाणी पीत असल्याने अनेक महिला व पुरुषांना गॅस्ट्रो व पोटदुखीसारख्या आजाराची लागण झाली. गहुली आरोग्य केंद्राची इमारत असतानाही येथे एकही निवासी डॉक्टर व नर्सेस राहत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तीन दिवसापासून गॅस्ट्रोची लागण झाली. गहुलीचे प्रशासक तथा ग्रामसेवक गावात येतच नसल्याच्या तक्रारी आहेत.
विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदमार्फत ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी लाखो रुपये खर्च करून शुद्ध पाण्याचा आरोप्लांट लावला होता. मात्र तो बंद अवस्थेत आहे. तत्कालीन जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी या बाबीकडे लक्ष का दिले नाही, असा प्रश्नही निर्माण होत आहे.
दूषित पाण्यामुळे नागरिकांना लागण झाली होती. मात्र योग्य ते उपचार ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आले. गावातील आरोग्य केंद्र उंच ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना तात्काळ सलाईन व आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामपंचायतमध्ये उपचार करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात असून रुग्णांची तब्येत चांगली आहे. सर्व आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
- डॉ. जय नाईक, तालुका आरोग्य अधिकारी, पुसद