महागावातील ९१ लाखांच्या रस्ता बांधकामाचे गौडबंगाल

By admin | Published: May 9, 2017 01:22 AM2017-05-09T01:22:09+5:302017-05-09T01:22:09+5:30

महागाव तालुक्यातील वेणी ते मोरदा या चार किलोमीटरच्या ९१ लाखांचे बजेट असलेल्या रस्ता बांधकामातील गैरप्रकार उघडकीस आला आहे.

Gaudabangal for construction of a cost of Rs.91 lakh | महागावातील ९१ लाखांच्या रस्ता बांधकामाचे गौडबंगाल

महागावातील ९१ लाखांच्या रस्ता बांधकामाचे गौडबंगाल

Next

मुख्य अभियंत्यांपर्यंत तक्रारी : माजी आमदार पुत्राचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : महागाव तालुक्यातील वेणी ते मोरदा या चार किलोमीटरच्या ९१ लाखांचे बजेट असलेल्या रस्ता बांधकामातील गैरप्रकार उघडकीस आला आहे. माजी आमदार पुत्रानेच त्यासाठी पुढाकार घेतला असून अमरावतीच्या बांधकाम मुख्य अभियंत्यांपर्यंत त्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
वेणी-सवना-वाकोडी-मोरदा या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४० च्या रस्ता सुधारणेची निविदा काढली गेली होती. ९१ लाख ५५ हजार १०० रुपये एवढी किंमत असलेली ही निविदा अकबरी नीलेश कन्नूभाई पटेल या कंत्राटदाराने १६.९९ टक्के कमी दराने भरली. ३ मार्च २०१७ ला या कामाचे आदेश जारी करण्यात आले. रस्त्याची साफसफाई करणे, जुना डांबरी रस्ता पूर्णपणे उखडणे, नष्ट करणे व त्याचे साहित्य रस्त्याच्या बाजूला व इतरत्र फेकणे हे प्रमुख काम होते. शिवाय या रस्त्याच्या निर्माणासाठी क्रेशर मेटलचा ७५ एमएम सरासरी थिकनेसने काम करुन नंतरची प्रक्रिया बीबीएम, हॉटमिक्स, सीलकोटने पूर्ण करणे अशी अट आहे. कंत्राटदाराला कमी दराच्या निविदेमुळे ७१ लाख १४ हजार ८८४ रुपयात हे काम पूर्ण करायचे आहे. परंतु प्रत्यक्षात या कामावर प्रचंड गोंधळ आहे. जुना डांबरीरस्ता उखडून त्याचे साहित्य इतरत्र विल्हेवाट लावण्याऐवजी त्याच रस्त्यावर दाबले जात आहे. या कामावर क्रेशर मेटल ऐवजी हातफोडी गिट्टी वापरुन ४० टक्के मुरुमाचा वापर सुरू आहे. जुन्या काळात होणाऱ्या डब्ल्यूबीएम स्वरूपाचे हे काम केले जात आहे. सुमारे चार किलोमीटरच्या या रस्त्याचे बेसिक कामच चुकीच्या पद्धतीने होत असल्याने व त्यात नवीन तंत्रज्ञानाचा कोणताही वापर नसल्याने या रस्त्याच्या उर्वरित कामाची किंमत व उपयोगिता झिरो ठरणार आहे.
या बोगस कामाबाबत वाकोडीचे माजी आमदार भीमराव देशमुख यांचे पुत्र शिवाजीराव देशमुख यांनी सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुसद येथील कार्यकारी अभियंता धोेत्रे यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रार नोंदविली. मात्र त्यांच्यात मोठ्या आवाजावरून वाद झाल्याने देशमुख यांनी थेट अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला. अधीक्षक अभियंत्यांनी देशमुख यांचे समाधान केले. आपण स्वत: स्पॉट व्हीजीटला येऊ व तपासणी करून सर्व काही व्यवस्थित करून देऊ, अशी ग्वाही त्यांना दिली. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
रस्त्यातील गैरप्रकार आता सामान्य नागरिकांच्याही निदर्शनास आला आहे. ते या गैरप्रकाराचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. अधीक्षक अभियंत्यांनी भेट देऊन कंत्राटदाराला हे संपूर्ण काम सुरुवातीपासून पुन्हा करायला सांगावे, अशी परिसरातील गावकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: Gaudabangal for construction of a cost of Rs.91 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.