टेंभीच्या गौतमची संगीतक्षेत्रात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:47 PM2018-04-04T21:47:50+5:302018-04-04T21:47:50+5:30
तालुक्याच्या टेंभी या गावातील गौतम हा युवक आपल्या अष्टपैलू आवाजाने महाराष्ट्र गाजवतो आहे. गायनाला जीवन माणनाऱ्या गौतमचे विविध अल्बम निघाले आहेत. आता तो पहिल्यांदाच गोंडी चालीवर भीमगीत गातोय. त्याच्या आवाजाची जादू संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्याच्या टेंभी या गावातील गौतम हा युवक आपल्या अष्टपैलू आवाजाने महाराष्ट्र गाजवतो आहे. गायनाला जीवन माणनाऱ्या गौतमचे विविध अल्बम निघाले आहेत. आता तो पहिल्यांदाच गोंडी चालीवर भीमगीत गातोय. त्याच्या आवाजाची जादू संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे.
एक हजार लोकसंख्येच्या टेंभी गावातील गौतम गोविंद पाढेण याने शालेय जीवनापासूनच या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध ठिकाणचे मंच गाजवित त्याने बक्षिसांची कमाई केली आहे. आपल्या आवाजाने प्रत्येक रसिकाच्या मनात घर केले आहे. मागील २५ वर्षांपासून त्याचा हा गीत प्रवास सुरू आहे. त्याचा ‘भीम माझा’ हा पहिला अल्बम खूप गाजला. लग्नकार्यप्रसंगी तो विनाशुल्क आपला कार्यक्रम सादर करतो.
गोंडी चालीवर भीम गीताचा अल्बम प्रत्येकाच्या पसंतीस येईल, असा त्याचा दावा आहे. यासाठीचे चित्रिकरणही झाले आहे. अमोल मोहिते (मुंबई), राहुल कांबळे (गणेशपूर, मंगरूळपीर) यांनी या अल्बमसाठी गीत लिहिले आहे. एका छोट्या गावातील गौतमची ही भरारी प्रेरणादायी आहे. त्याला सुबोध वाळके, अॅड. रामदास राऊत, मोहनदास भोयर, अरविंद तलवारे, राहुल वाहडे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे.