गावगुंड अनिलची पंचक्रोशीत दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 09:52 PM2018-11-26T21:52:27+5:302018-11-26T21:52:51+5:30

पोलीस पथकावर हल्ला करून सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ठार मारणाऱ्या कुख्यात अनिल मेश्रामची पंचक्रोशीत दहशत होती, अशी माहिती आता पुढे आली आहे.

Gavgund Anilchi Panchcrash Panic | गावगुंड अनिलची पंचक्रोशीत दहशत

गावगुंड अनिलची पंचक्रोशीत दहशत

Next
ठळक मुद्देअनेकांवर हल्ले : अवैध दारू विक्रीचाही होता व्यवसाय

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : पोलीस पथकावर हल्ला करून सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ठार मारणाऱ्या कुख्यात अनिल मेश्रामची पंचक्रोशीत दहशत होती, अशी माहिती आता पुढे आली आहे.
माथेफिरू अनिलचा कुणाशीही वाद झाला की, तो त्याला बदडून काढायचा. यासाठी त्याने खास वेळूचा बेत तयार केला होता. अनेकजण भीतीपोटी याबाबत पोलिसांकडे तक्रारही करीत नसत. अनिलने यापूर्वी काही काळ गावात अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसायही केला. दोन वर्षांपूर्वी हिवरी येथील बाली रामपुरे (३६) या महिलेवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याच्या घटनेनंतर अनिल मेश्राम कारागृहात गेला. या काळात गावात शांतता होता. मात्र कारागृहातून सुटून आल्यानंतर पुन्हा गाव दहशतीखाली आले. काही दिवस त्याने पुन्हा अवैधरित्या दारूची विक्री केली, असे सांगितले जाते. अतिशय क्रूर स्वभावाच्या अनिल मेश्राम याची त्यामुळे गावगुंड म्हणून पंचक्रोशीत ख्याती आहे.
पोलीस पथकावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर पंचक्रोशी हादरून गेली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने सोमवारी सकाळी गावात जाऊन घटनास्थळाला भेट दिली, तेव्हा गावात स्मशानशांतता होती.
हिवरीला आले पोलीस छावणीचे स्वरूप
हिवरी येथे पोलिसांवर हल्ला झाल्याचे वृत्त कळताच संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. फरार आरोपीच्या शोधात पोलिसांची पथके रवाना झाली, तर घटनास्थळी वणी, पांढरकवडा, मुकूटबन, पाटण, शिरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे रूप आले होते.
राजेंद्र कुडमेथे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे आरोपीच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुडमेथे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन सोमवारी सकाळी मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव वणी येथील मेघदूत कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेथून चोख पोलीस बंदोबस्तात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. स्थानिक मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी यवतमाळहून आलेल्या विशेष पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. याप्रसंगी एसडीपीओ विजय लगारे, वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Gavgund Anilchi Panchcrash Panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.