गझल व सूफी गायिका पूजा गायतोंडे यांची आज यवतमाळात स्वरांजली
By Admin | Published: March 23, 2016 02:16 AM2016-03-23T02:16:26+5:302016-03-23T02:16:26+5:30
सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार, २३
यवतमाळ : सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार, २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता येथील प्रेरणास्थळावर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गझल आणि सूफी गायकीने रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटविणाऱ्या आणि गतवर्षीचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्राप्त पूजा गायतोंडे स्वरांजली सादर करणार आहेत.
अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची साधना करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा या संगीताच्या निस्सीम साधक होत्या. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना आपल्या गायनातून पूजा गायतोंडे स्वरांजली अर्पण करणार आहेत. पारंपरिक रागदारीच्या साह्याने पूजा गायतोंडे गझल आणि सूफी रचना सादर करते. त्यांच्या गायकीने रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटविला आहे. निसर्गदत्त गोड गळा आणि अद्वितीय क्षमतेच्या बळावर पूजा आज रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे.
अशा या प्रतिभावंत गायिकेला ‘लोकमत’च्यावतीने ‘सूर ज्योत्स्ना’ राष्ट्रीय संगीत पुरस्कार २२ मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सिनेअभिनेत्री शबाना आजमी आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी ४ एप्रिल २०१५ रोजी आयोजित मिजवान फॅशन शोमध्ये पूजाच्या स्वरांनी वेगळा रंग भरला. मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक सुवर्णपदके प्राप्त केली. दिल्लीतील जामिया मिल्लीया इस्लामिया विद्यापीठाने गायनाच्या कार्यक्रमातही पूजाला सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. सुप्रसिद्ध ठाणे फेस्टिवलमध्ये पूजाचा सहभाग होता. पद्मश्री पंकज उदास आणि तलत अजीज यांनी आयोजित केलेल्या खजाना गझल फेस्टिवलमध्येही तिचे सादरीकरण महत्त्वपूर्ण ठरले. अशी ही ख्यातनाम गायिका यवतमाळकर रसिकांना आपल्या गझल आणि सूफी गायनातून मंत्रमुग्ध करणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(नगर प्रतिनिधी)
विविध पुरस्काराने सन्मानित
४मुंबईच्या आर.ए. पोदार महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली. परंतु संगीताची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्या संगीताकडे वळल्या. सीओन (मुंबई) येथील श्रीवल्लभ संगीत विद्यालयाचे विकास भाटवडेकर, धनश्री पंडित राय, लालजी देसाई, संतोष कुडव, स्वामी चैतन्य स्वरूपजी यांच्यामुळे पूजा सुगम शास्त्रीय गायनाकडे वळली. सध्या उस्ताद मुन्नावर मासूम सईद खान यांच्याकडून ती सूफी आणि गझल गायनाचे धडे गिरवीत आहे. शास्त्रीय गायनातील ख्यातनाम आग्रा घराण्याचे दिवंगत पं. सी.एस.आर. भट आणि त्यांचे शिष्य राजा उपासनी, सुनीता गांगोली यांच्याकडूनही पूजाला शास्त्रीय गायनासाठी मार्गदर्शन लाभले आहे. गायनासोबत पूजाचे हार्मोनियमवरही प्रभुत्व असून ती हार्मोनियमचे शिक्षण पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडून घेत आहे. उस्ताद इब्राहिम दुर्वेश यांच्याकडून अस्खलित उर्दू उच्चार शिकून घेतले. त्यामुळेच पूजाची गायकी रसिकांना मंत्रमुग्ध करते.
सकाळी ९ वाजता संगीतमय श्रद्धांजली
४लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त २३ मार्च रोजी सकाळी ९ ते १० या वेळात संगीतमय श्रद्धांजली सभेचे आयोजन येथील दर्डा उद्यानस्थित समाधीस्थळ येथे करण्यात आले आहे.