आत्मा योजनेतील दुग्ध व्यवसायातून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न

By admin | Published: March 2, 2015 02:11 AM2015-03-02T02:11:32+5:302015-03-02T02:11:32+5:30

शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. दरवर्षी निसर्ग साथ देईलच याची खात्री नाही. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे.

Generation of 10 thousand rupees from the milk business in the Sutra scheme | आत्मा योजनेतील दुग्ध व्यवसायातून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न

आत्मा योजनेतील दुग्ध व्यवसायातून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न

Next

यवतमाळ : शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. दरवर्षी निसर्ग साथ देईलच याची खात्री नाही. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे. त्यातच दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय निवडल्यास उत्पन्नाचे एक शाश्वत साधन निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशाच जोडधंद्याची निवड केल्याने झरी जामणी तालुक्यातील बंदी वाढोणा येथील सोनबा दमडू टेकाम याला शास्वत उत्पन्नाचा मार्ग गवसला आहे.
सोनबा दमडू टेकाम या शेतकऱ्याकडे कोरडवाहू तीन हेक्टर इतकी जमीन आहे. या जमिनीत ते खरीप हंगामात कापूस, तूर, ज्वारी यासारखी पीके घ्यायचे. यातून त्यांना ६० ते ६५ हजाराचे उत्पन्न मिळायचे. या कमी उत्पन्नात त्यांना आपले कुटुंब चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
त्यामुळे त्यांनी शेतीस पूरक जोडधंदा सुरु करण्याचे ठरविले होते. त्यातुनच त्यांनी कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शाश्वत शेती प्रकल्पाची माहिती घेतली व दुग्धव्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
दुग्ध व्यवसायाची पुरेपुर माहिती नसल्याने राज्य कृषी विस्तार कार्यक्रम अर्थात आत्मा अंतर्गत अभ्यासदौरा व प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायास सुरुवात केली. प्रशिक्षणात पोषक आहार कोरडा चारा जसे ज्वारी, मका, गतवर्षीय पिकांची कुटी, सोयाबीन व तुर पिकाचे कुटार यापासून जनावरांसाठी पोषक आहार तयार करणे तसेच गायींच्या गोठ्याचे व्यवस्थापन व गायींच्या पाणी व आहाराच्या बाबींची शास्त्रोक्त माहिती झाली.
प्रशिक्षणानंतर योजनेतून अनुदानावर दोन संकरीत गाई त्यांनी खरेदी केल्या. या दोन गायींपासून त्यांना सकाळी १० व संध्याकाळी १० असे २० लिटर दुधाचे उत्पादन सुरु झाले. बाजारात प्रति लिटर २० रुपये याप्रमाणे दर मिळत असल्याने मासिक मिळकत १२ हजार व खर्च दोन हजार रुपये जाता निव्वळ मासिक नफा १० हजार रुपये इतका शिल्लक राहत आहे.
आत्माचे प्रशिक्षण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदानावर मिळालेल्या संकरीत गायीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होवू शकलो, असे शेतकरी सोनबा दमडू टेकाम यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Generation of 10 thousand rupees from the milk business in the Sutra scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.