यवतमाळातील कोरोना व्हायरसमध्ये जनुकीय बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 01:09 PM2021-02-19T13:09:14+5:302021-02-19T13:10:37+5:30
Yawatmal News यवतमाळच्या कोरोना व्हायरसमध्ये जनुकीय बदल झाल्याचे पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथील कोरोना व्हायरस हा वेगळ्या स्टेनचा आहे काय, याची तपासणी करण्यात आली. ही शंका दूर करण्याकरिता पुणे येथील प्रयोगशाळेत कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या चार रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले. त्यामध्ये यवतमाळच्या कोरोना व्हायरसमध्ये जनुकीय बदल झाल्याचे पुढे आले आहे.
इंग्लंडमध्ये फैलावत असलेला कोरोनाचा व्हायरस हा सर्वात घातक आहे. त्यामुळे रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. अशाच पार्श्वभूमीवर यवतमाळ, सातारा, अमरावती येथे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाचा नवीन कुठला व्हायरस आला काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली होती. ती दूर करण्यासाठी या तीन जिल्ह्यातील प्रत्येक चार रुग्णांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले. त्यामध्ये यवतमाळातील चार नमुन्यांपैकी एका नमुन्यातील कोरोना व्हायरसमध्ये जनुकीय बदल झाल्याचे आढळून आले. म्युटेशनमुळे जुन्या व्हायरसमध्ये बदल झाले. यात आढळलेला व्हायरस एन-४४०-के हा आहे. या व्हायरसची क्षमता जुन्याच व्हायरसइतकी असून आतापर्यंत सुरू असलेला औषधोपचार यावर प्रभावी असल्याचे सांगितले जाते. कोरोना लसीकरणालाही हा व्हायरस प्रतिसाद देत नसल्याने याचा धोका कमी आहे.
चार पैकी एका नमुन्यातील व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्याचे आढळून आले. मात्र, तो घातक नसून पूर्वी आढळून आलेल्या व्हायरसमधीलच बदल आहे. यावर सुरू असलेला औषधोपचारच प्रभावी ठरतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, प्रत्येकाने योग्य ती काळजी घेऊन घराबाहेर पडण्याची गरज आहे.
- डाॅ. विवेक गुजर, विभाग प्रमुख, सूक्ष्म जीवशास्त्र.