पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत झुंबड

By admin | Published: July 27, 2016 12:38 AM2016-07-27T00:38:34+5:302016-07-27T00:38:34+5:30

पीक विमा काढण्यासाठी अवघे चार दिवस उरले असल्याने उमरखेड शहरासह तालुक्यातील विविध बँकांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.

To get crop insurance, the Shrimps in the farmers' bank | पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत झुंबड

पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत झुंबड

Next

प्रमाणपत्रासाठी पायपीट : अवघे चारच दिवस उरल्याने उमरखेडच्या शेतकऱ्यांची उडाली धांदल
उमरखेड : पीक विमा काढण्यासाठी अवघे चार दिवस उरले असल्याने उमरखेड शहरासह तालुक्यातील विविध बँकांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. बँकांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसून शेतकरी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. सर्वाधिक गर्दी जिल्हा बँकांच्या शाखेत दिसत आहे.
नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढतात. यावर्षी पीक विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता बँकांमध्ये झुंबड केली आहे. दरवर्षी सातबाराचा उतारा, आठ अ, तलाठी पेरेपत्रक व अर्ज भरुन पीक विमा काढला जातो. परंतु यंदा पीक विमा योजनेचे प्रारुप बदलून कागदपत्रे कोणती लागणार याविषयी संभ्रमावस्था होती. शहरातील अनेक झेरॉक्स सेंटरवरून गतवर्षीच्या योजनेचे अर्ज शेतकऱ्यांना विकण्यात आले.
यात तलाठी पेरेपत्रक आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेचा नवीन अर्ज आला. या सातबाराचा उतारा पेरेपत्रक, आधार कार्ड आदींचा उल्लेख आहे. शेतकरी पेरे प्रमाणपत्रासाठी तलाठ्यांकडे गेले असता तलाठ्यांनी पेरे प्रमाणपत्र देण्यास असर्थता दर्शविली. आमचा पीक पाहणीचा कालावधी महसूल अधिनियमातील खंड ४ नुसार पेरेपत्रक आॅगस्ट महिन्यात उभ्या पिकाची पाहणी केल्यानंतर दिले जाते असे सांगण्यात आले. परंतु पीक विम्यात सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वघोषणा पत्र भरुन बँकेत विमा भरावा असे सांगण्यात आले.
त्यानंतर शेतकऱ्यांची बँकांमध्ये गर्दी झाली आहे. त्यातच पीक विमा योजनेच्या अर्जाचा तुटवडा निर्माण झाला आहे. उमरखेडच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. पाय ठेवायलाही जागा नाही. तर अनेक शेतकऱ्यांची कागदपत्रांची जुळवाजुवळ करीत असल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: To get crop insurance, the Shrimps in the farmers' bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.