जलसंवर्धनातून समाधान मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:14 PM2018-01-18T22:14:51+5:302018-01-18T22:15:02+5:30
दैनंदिन कामाव्यतिरिक्त मानवी जीवनात मुलभूत फरक पाडणारे जलसंवर्धनाचे काम करून समाधान मिळवा. यासाठी पाणी फाउंडेशनच्या कामास प्राधान्य द्या, असे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दैनंदिन कामाव्यतिरिक्त मानवी जीवनात मुलभूत फरक पाडणारे जलसंवर्धनाचे काम करून समाधान मिळवा. यासाठी पाणी फाउंडेशनच्या कामास प्राधान्य द्या, असे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात तहसील कार्यालय व पाणी फाउंडेशनच्या वतीने ग्रामसेवक, सरपंच व कृषीसेवक यांची कार्यशाळा पार पडली. त्यावेळी उपविभागीय अधिकारी तांगडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते. तहसीलदार सचिन शेजाळ, तालुका कृषी अधिकारी अशोक भवरे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळी, अशोक बगाडे आदी यावेळी उपस्थित होते.
गावगावात भूजलस्तर वाढविण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यसंपादनाचे काम करण्यात स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन तांगडे यांनी केले. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून मूल्यांकन पद्धत समजून घेऊन गाव व तालुका पाणीदार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती करण्यात पुढाकार घेऊन जलचळवळ निर्माण करू. यासाठी स्वयंसेवी संस्था व गावातील दानशूर व्यक्तीची मदत प्रशासन म्हणून सर्वतोपरी मदत करण्यात येइल, असे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.
ग्रामसेवक, सरपंच यांना तालुका कृषी अधिकारी अशोक भवरे, जिल्हा समन्वयक संतोष गवळी यांनी मार्गदर्शन केले. वडगावचे सरपंच दिनेश कटनकर, पंकज तिवारी, बाबाराव राठोड, गजानन खोडे, नीलिमा घोटेकर आदी सरपंचांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक अश्विनी दवारे यांनी केले. सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. तर आभार चंदन सावते यांनी मानले.