कामावर जायचे की पाणी भरायचे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:47 PM2018-04-06T23:47:52+5:302018-04-06T23:47:52+5:30
हातपंपाचा परिसर म्हणून वंजारी फैलातील वसाहतीचा काही भाग ओळखला जातो. या हातपंपांना सध्या पाण्याचा थेंबही नाही. मात्र तुमच्या भागात हातपंप आहे.
रुपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हातपंपाचा परिसर म्हणून वंजारी फैलातील वसाहतीचा काही भाग ओळखला जातो. या हातपंपांना सध्या पाण्याचा थेंबही नाही. मात्र तुमच्या भागात हातपंप आहे. मग तुम्हाला टँकरची आवश्यकता काय आहे? असे म्हणून या भागात टँकरच पाठविला जात नाही. आता आम्ही दिवसभर काम करायचे की पाण्यासाठी गावभर फिरायचे? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
आयुष्याची ६५ वर्षे झाली. पण असा दुष्काळ आम्ही पाहिला नाही. याच्या आधीही टंचाई आली. पण जीनातली विहीर, नाल्याकाठची विहीर यातून पाणी भरले. नळ आले अन् सारं चित्र बदलले. आता विहिरीत गाळ साचला आहे, असे मालती मार्इंदे म्हणाल्या.
या भागात सर्वसामान्य, रोजमजुरी करणारे लोक राहतात. आठ ते १० दिवसापूर्वी टँकर आला. आता येतच नाही. रस्त्यावर टाक्या लावायला सांगितले. काहींना पाणी भेटले. काहींना नाही, असे सुषमा माडकुटे, नंदा राऊत, सुशिला ठाकरे, छाया डुमरे, सुनंदा शेंडे म्हणाल्या.
नळाचे पाणी २१ दिवसांपूर्वी आले. त्या पाण्यात प्रचंड गाळ होता. पाणी पिवळं होतं. पाण्याला वास होता. आता पिण्याचे पाणी म्हणून जपून ठेवले. त्या पाण्यावर सारखी तुरटी फिरवली. जीवन ड्रॉप टाकला. भांड्यात खाली गाळच आहे. तसेच पाणी प्याव लागते. या पाण्यात भागत नाही. म्हणून साईनगर, पिंपळगाव, आदर्शनगर, पतंगे ले-आऊट या सारख्या भागातून पाणी आणावे लागते. अख्खी वस्ती रात्रभर पाण्यासाठी जागते. रोजमजुरी सोडून पाण्यासाठी थांबावे लागते. असे जया बगमारे, शिताबाई ठेंगरे, माया ठेंगरे, पुष्पा ठेंगरे, म्हणाल्या.
काही भागात २४ तास नळ असते. आम्हाला पाणी नाही. या भागात पाणी वाटपासाठी टाकी बांधण्यात आली. दुष्काळात या टाकीत पाणी टाकले जात होते. तेथूनच पाणी नेल्या जायचे. आता या टाक्यात माती भरून आहे. यामुळे इतक्या मोठ्या टाक्याचा कुठलाच उपयोग होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यासाठी अतिरिक्त टँकर देण्यात यावे, शुध्द पाणी द्यावे असे मत नितीन माटे यांनी व्यक्त केले.
गल्लीत टँकर जात नाही म्हणून आम्हाला रस्त्याच्या दोनही भागाकडच्या महिला पाणी भरण्यासाठी एन्ट्री देत नाही. आम्हाला पाणीच भेटले नाही, असे भागिरथाबाई मेश्राम, गिरजा शेळके, सरस्वती मेश्राम, सुशिला ठेंगरे म्हणाल्या.
आमच्या भागात सरकारी स्टँडपोज होता. दुष्काळामुळे तो उपटून टाकला आता पाणी भरायला स्टँडपोजही नाही. हातपंप बंद पडला. दुरूस्ती झाली नाही, असे जोसना ठेंगरे, रेखा ठेंगरे, मिना नागमोते, वेणू मरगडे, मंगला ठाकरे, पुष्पा शेंडे म्हणाल्या. या भागात भांडणे करणाऱ्या लोकांनाच जास्त पाणी मिळते, असा आरोपही यावेळी काही महिलांनी केला.
१०० रूपयात तीन ड्रम
या भागात पाण्यासाठी दुसºया भागाकडे धाव घ्यावी लागते. काही खासगी बोअरधारक १०० रूपयाला तीन ड्रम पाणी विकतात. एका ड्रमला पाणी आणण्याचे ३० रूपये भाडे वेगळे द्यावे लागते.
हापशी गाळाने भरली
कालीमाता मंदिराजवळील हापसीने या भागात आजपर्यंत पाणी प्रश्न सोडविला. ही हापसी आतून गाळल्या गेली आहे. त्याला क्रशिंग केले तर चांगले पाणी लागते.
नाल्याच्या विहिरीत गाळ
नाल्याकाठच्या विहिरीत प्रचंड पाणी आहे. पण त्यात गाळ मोठ्या प्रमाणात आहे. हा गाळ उपसला तर या भागात पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्याची खबरदारी घेण्याची गरज आहे.
उलट्या आणि हगवण
याच भागातील काही ठिकाणी टँकरच्या पाणी पुरवठ्यातून जलजन्य आजार उद्भवल्याची माहिती नंदा चव्हाण, लिना सोनी, शोभा बिडवे, आशा जायभाये यांनी दिली. पाण्यामुळे अंगावर खाज येत आहे. लहान मुलांना हगणवण, उलट्या होत असल्याचे त्या म्हणाल्या.