जिल्हा बॅंक आर्णीतील घबाड चार कोटींचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 05:00 AM2021-03-10T05:00:00+5:302021-03-10T05:00:02+5:30
या प्रकरणातील संशयितांनी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या दोन संचालकांसाठी आर्णी, घाटंजी, दिग्रस तालुक्यात तन-मन-धनाने प्रयत्न केल्याची माहिती आहे. अवैध सावकारीसाठी बॅंकेच्या तिजोरीतून वापरली जाणारी रोकड कृषी सोबतच यवतमाळात भिसीसाठी ज्वेलर्सपर्यंत येत असल्याचे सांगण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्णी शाखा कार्यालयाच्या तिजाेरीतील लाखो रुपयांची रोकड परस्पर अवैध सावकारीत दोन टक्के व्याज दराने वापरण्यासाठी दिली जात असल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे आले. मात्र प्रत्यक्षात या शाखेतील घबाड किमान चार कोटी रुपयांच्या घरात असल्याची चर्चा बॅंकेच्याच वर्तुळात आहे.
जिल्हा बॅंक आर्णी शाखेच्या तिजोरीत ३० लाख रुपयांची रोकड कमी असल्याचा निनावी फोन २६ ते २७ फेब्रुवारी दरम्यान बॅंकेच्या मुख्यालयात आला. तेव्हापासून या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. यवतमाळचे पथक पोहोचल्यानंतर संबंधितांनी अवघ्या काही मिनिटांत तब्बल ३० लाखांची कॅश पोत्यात आणून बॅंकेत जमा केली व आपल्यावरील तातडीने होणारी कारवाई थांबविली. या प्रकरणात रोखपालाची तडकाफडकी महागावात बदली करण्यात आली असली तरी त्यांचा तेवढा सहभाग नसून एक कर्मचारी मास्टर माईंड आहे, त्याचेच या प्रकरणात ‘अमूल्य’ योगदान असल्याचे बोलले जाते.
बॅंक वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, आर्णी शाखेतील हे घबाड तीन ते चार कोटी रुपयांचे आहे. वसूल केलेल्या कर्जाची रक्कम, निराधारांची रक्कम गहाळ असून, ती भरली गेली नसल्याचे सांगितले जाते. अनेक वर्षांपासून हा गैरप्रकार आर्णी शाखेत सुरू आहे. त्यासाठी कंत्राटींची मदत घेतली जात आहे. नागपुरातील ज्वेलर्समधून होणारी खरेदी, लॉकरमधील सुमारे दीड किलो सोने, तीन ते चार वाहने, दुमजली घर, त्यातील फर्निचर-एसी याबाबींची चर्चा होत आहे.
या उलाढालीत नेमके वाटेकरी कोण? याबाबत तर्क लावले जात आहे. या प्रकारावर जिल्हा बॅंकेतीलच संबंधित दोन संचालक पांघरुण घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणातील संशयितांनी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या दोन संचालकांसाठी आर्णी, घाटंजी, दिग्रस तालुक्यात तन-मन-धनाने प्रयत्न केल्याची माहिती आहे. अवैध सावकारीसाठी बॅंकेच्या तिजोरीतून वापरली जाणारी रोकड कृषी सोबतच यवतमाळात भिसीसाठी ज्वेलर्सपर्यंत येत असल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेत एवढा मोठा गौडबंगाल सुरू असताना अद्याप या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याची धाडसी भूमिका संचालक मंडळ, व्यवस्थापन व प्रशासन यापैकी कुणीही न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. ते पाहता या प्रकरणाला बॅंकेतूनच कुणाचे तरी पाठबळ मिळत असावे या शंकेला बळ मिळत आहे.
या प्रकरणात एक-दोन संचालक संशयाच्या भोवऱ्यात असताना जनतेच्या नजरेत मात्र ठोस कारवाई होत नसल्याने संपूर्ण संचालक मंडळाकडेच साशंकतेने पाहिले जात आहे.
या प्रकरणात आर्णी शाखेचे गेल्या १३-१४ वर्षांतील एकूणच व्यवहारांचे पारदर्शक व संपूर्ण ऑडिट होणे अपेक्षित आहे.
संचालक मंडळापुढे ‘वास्तव’ सादर करण्याचे आदेश
थकबाकी वसुलीच्या अनुषंगाने मंगळवारी झालेल्या जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या बैठकीत आर्णीतील प्रकरणावर चर्चा झाली. ही बैठक बुधवारीही पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे आर्णीच्या प्रकरणातील नेमके ‘सत्य’ काय आहे ते संचालक मंडळ बैठकीपुढे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.