महागावचे पाणी पुसद तालुक्यात वळविण्याचा घाट
By admin | Published: January 8, 2016 03:23 AM2016-01-08T03:23:48+5:302016-01-08T03:23:48+5:30
पूस धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी कासोळा ते मोरवाडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली.
सिंचनावर टाच : कासोळा ते मोरवाडी मार्गाची पाहणी
महागाव : पूस धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी कासोळा ते मोरवाडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली. महागाव तालुक्याचे पाणी पुसद तालुक्यात पळविण्याचा हा घाट असून यामुळे महागाव तालुक्याची सिंचन क्षमता पुन्हा कमी होणार आहे.
महागाव तालुक्यातील कासोळा, कान्हा, सारखणी, गुंज, सवना या परिसराला पूस धरणाचे पाणी पुरविण्यात येते. परंतु आता पाण्यात कपात करून हेच पाणी कासोळ्यापासून काळी दौलत मार्गावर असलेल्या मोरवाडी, कौडगाव, कासोळा भागात फिरविण्याचा विचार सुरू आहे. पूस धरणाची सिंचन क्षमता पाच हजार ९९९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात तवढे सिंचन होत नाही.
रबी तीन हजार ८०८ हेक्टर, उन्हाळी ५४९, खरीप ५३३ हेक्टर असे चार हजार ८९० हेक्टर सिंचन कागदोपत्री गृहित धरले गेले आहे. यातून पाण्याचा अपव्यय होत असल्याने प्रत्यक्षात चार
हजार हेक्टरपर्यंतच ओलित होत
आहे.
पुस धरणात सध्या ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उजवा कालवा २५ किलोमीटर तर डावा कालवा ३८ किलोमीटर आहे. डाव्या कालव्यावरूनच सर्वाधिक सिंचन होते. प्रकल्पाचे पाणी इटावा, लोणी, आरेगाव, पाळोदी, भाटंबा, हुडी, पिंपळगाव, कासोळा, कान्हा, सारखणी, गुंज, वेणी, सवना शिवारापर्यंत जाते. कासोळा, कान्हा, सवना गावातील शेतकऱ्यांना अधर पूस प्रकल्पाचे पाणी अंशत: मिळते. हाच मुद्दा पुढे करून पाणी कपातीचा घाट रचला जात आहे.
पाणी कासोळा ते मोरवाडी, कौळगाव आणि कासोळा शिवारातील शेतीला कसे पुरविता येईल याचा शोध घेण्याचे अलिखित आदेश मिळाल्याची माहिती आहे. त्याच अनुषंगाने ३० डिसेंबर रोजी या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गोरडे यांनी पाहणी केली. पाणी वळविण्याचा विचार सुरू असला तरी शासनाची मंजुरी तांत्रिक मान्यता आदी बाबींना वेळ लागणार आहे.
एकंदरित महागाव तालुक्यातील पाण्यावर आता पुसद तालुक्याचा डोळा असून या प्रकारामुळे शेतकऱ्यात चांगलाच रोष निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)