घाटंजी पालिकेने पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:41 AM2021-04-08T04:41:14+5:302021-04-08T04:41:14+5:30
घाटंजी : दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत दरवर्षी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी दिव्यांगांना अनुदान म्हणून दिले जाते. परंतु २०२० - ...
घाटंजी : दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत दरवर्षी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी दिव्यांगांना अनुदान म्हणून दिले जाते. परंतु २०२० - २१चे अनुदान ३१ मार्च होऊनही अद्याप देण्यात आले नाही. ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी साथी निराधार संघटनेचे अध्यक्ष महेश पवार यांनी मुख्याधिकारी अमोल मालकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
घाटंजी शहरात बरेच दिव्यांग आहेत. त्यामधे अंध, अपंग, कर्णबधिर आहेत. या दिव्यांगांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत. त्यांचे पुनर्वसन करावे, त्यांना उद्योगासाठी अर्थसहाय्य व्हावे, दिव्यांगांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी नगरपरिषदेने मदत करायला हवी, अशी योजना आहे. मात्र, याबाबत येथील नगरपरिषद उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकारने दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या विविध योजना आहेत. ज्यामध्ये ८० टक्के केंद्र सरकारचा सहभाग, तर २० टक्के नगरपरिषदेचा सहभाग असलेल्या अनेक योजना आहेत. यात अपंगांना सायकल, यंत्रावर चालणारी सायकल आदी वस्तूंचा समावेश आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा पुढाकार नगर परिषद घेत नाही. ज्यांना सायकलची आवश्यकता आहे, असे दिव्यांग लाभार्थी शहरात हालअपेष्टा सहन करीत आहेत. या दिव्यांगांना न्याय मिळाला पाहीजे. ते योजनांपासून वंचित राहू नयेत, असेही महेश पवार यांनी निवेदनातून स्पष्ट केले. ग्रामपंचायत स्तरावर अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधीतून विविध साहित्य आणि अनुदान दिले जाते. दिव्यांगांना घर टॅक्स माफ करण्यात येतो. याच प्रकारे नगर परिषदेनेही शहरातील दिव्यांगांना घर टॅक्स माफ करावे, असे निवेदन साथी निराधार संघटनेच्या सदस्यांनी दिले.