घाटंजी पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 09:22 PM2018-06-27T21:22:42+5:302018-06-27T21:23:39+5:30
जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या पतीच्या वागणुकीविरुद्ध पंचायत समिती कर्मचाºयांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. डेप्युटी सीईओंना यासंबंधी निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या पतीच्या वागणुकीविरुद्ध पंचायत समिती कर्मचाºयांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. डेप्युटी सीईओंना यासंबंधी निवेदन सादर केले.
जिल्हा परिषद सदस्य सरिता जाधव व त्यांचे पती मोहन जाधव मंगळवारी पंचायत समितीत आले होते. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांसोबत अर्वाच्य शब्दात वाद घातला. बीडीओंचा मोबाईल जबरीने हिसकावून घेतला. नंतर मोहन जाधव यांनी पत्नीला बीडीओ मंगेश आरेवार यांच्या कक्षात कोंडून ठेवले. बीडीओंवर लांछनास्पद आरोप करण्याच्या दृष्टीने ही असभ्य वर्तणूक केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्याचवेळी परिचर संगनवार यांना जाधव यांनी बीडीओंच्या कक्षात जाण्यापासून रोखले व धक्काबुक्की करून बाहेर काढले. मात्र इंदिराबाई ढोके बीडीओंच्या कक्षात पोहोचल्या व त्यांनी त्यांच्या बाजूला ठिय्या मांडला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
यावेळी मोहन जाधव यांनी बीडीओंच्या कक्षाबाहेर वऱ्हांड्यात उपस्थित महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. महिला कर्मचाऱ्यांचे मोबाईलवर फोटो काढून शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पारदर्शक कार्यप्रणालीमुळे दलालांचे धाबे दणाणले असून प्रामाणिक अधिकाऱ्यासोबत अशी लांछनास्पद घटना घडणे अतिशय दुर्दैवी असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करून योग्य पोलीस बंदोबस्त करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे एका निवेदनातून केली आहे.
डेप्युटी सीईओंची घाटंजीला भेट
पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे कामबंद आंदोलन केल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड यांनी बुधवारी घाटंजीला भेट दिली. सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारच्या घटनेचा निषेध करीत त्यांच्याकडे सीईओंच्या नावे असलेले निवेदन सुपूर्द केले. निवेदनावर पंचायत समितीच्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.