घाटंजी आदिवासी कृती समितीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 09:57 PM2017-12-27T21:57:50+5:302017-12-27T21:58:01+5:30
तेलंगणात आरक्षणावरून झालेल्या विविध घटनांचा आदिवासी कृती समितीने येथे निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तेलंगणात आरक्षणावरून झालेल्या विविध घटनांचा आदिवासी कृती समितीने येथे निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. सदर प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी एकता कृती समितीने दिला.
तेलंगणात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आदिवासी बांधवांनी हैदराबाद येथे मोठा मोर्चा काढला. यानंतर आदिलाबाद जिल्ह्याच्या उटनूर मंडळातील सोनापूर (बेत्तलगुड) येथे पुतळा विटंबनाचा प्रकार घडला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर काही लोकांनी आदिलाबाद जिल्ह्याच्या मीराईगुडा मंडल अंतर्गत उटनूर येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत विष टाकले. यामुळे ४० जणांना विषबाधा झाली.
सदर प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी, घटनांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना आदिवासी समाजातील व कृती समितीचे अध्यक्ष भीमराव मंगाम, तुळशीराम आत्राम, जयवंत आडे, प्रवीण मडावी, रामचंद्र मडावी, रमेश धुर्वे, हरिभाऊ पेंदोर, मनोज मेसराम, विनोद सलाम, नितेश मसराम, मीराबाई किनाके, कैलास कोरवते आदींची उपस्थिती होती.