घाटंजीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:39 PM2018-08-04T22:39:16+5:302018-08-04T22:47:32+5:30
येथे नव्यानेच रुजू झालेल्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांच्या प्रशासकीय कामाविरुद्ध एल्गार पुकारून शनिवारी घाटंजीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे पालिकेतील मूलभूत सुविधांची कामे ठप्प पडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथे नव्यानेच रुजू झालेल्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांच्या प्रशासकीय कामाविरुद्ध एल्गार पुकारून शनिवारी घाटंजीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे पालिकेतील मूलभूत सुविधांची कामे ठप्प पडली होती.
सीओंच्या अडेलतट्टू आणि दफ्तर दिरंगाईच्या धोरणामुळे शहरातील विकास कामे थांबल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शासनाकडून १४ व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त असूनही आणि विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊनही सीओंनी कामाचे आदेश दिले नाही. त्यामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या. पाणीटंचाई तीव्र झाली. ३४ बोअरवेलची कामे प्रलंबित आहे. या सर्वबाबीला मुख्याधिकारी मोटघरे कारणीभूत असून त्यांना निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
दलित वस्ती सुधार योजना, सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्तीसुधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामांना खीळ बसली आहे. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून रोगराई पसरत आहे. सीओ सूचना न देताच परस्पर अनुपस्थित राहत आहे, आदी आरोप आंदोलकांनी केले. शनिवारी दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद होती. उपनगराध्यक्ष शैलेष ठाकूर यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली काढण्यात आली होती. या बंदमध्ये नागरिक सहभागी झाले होते.
‘सीओं’चा शहरवासीयांतर्फे सत्कार
मुख्याधिकारी विकास कामात अडथळा आणत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत असतानाच दुसरीकडे त्यांचा शहरवासीयांतर्फे सत्कार केला जातो. विशेष म्हणजे, बंदच्या दिवशीही त्यांचा कार्यालयात जाऊन सत्कार करण्यात आला. या विरोधाभासी चित्रामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आपण विकास कामात अडथळा आणत नाही, कायदेशीर काम केले जात आहे, असे मुख्याधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. आता नेमके कोण चुकतो, याचा शोध घेण्याची वेळ लोकांवर आली आहे.