घाटंजीत जप्ती कारवाई तीव्र
By admin | Published: February 22, 2017 01:25 AM2017-02-22T01:25:04+5:302017-02-22T01:25:04+5:30
थकीत मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम नगरपरिषदेने तीव्र केली आहे. प्रमाणापेक्षा अधिक रक्कम थकीत असलेल्या प्रतिष्ठानांवर जप्ती आणली जात आहे.
थकीत करवसुली : जिनिंगने भरली ११ लाखांची रक्कम
घाटंजी : थकीत मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम नगरपरिषदेने तीव्र केली आहे. प्रमाणापेक्षा अधिक रक्कम थकीत असलेल्या प्रतिष्ठानांवर जप्ती आणली जात आहे. त्यामुळे कराचा भरणा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी येथील एका जिनिंगवर जप्तीची कारवाई केली होती. या प्रतिष्ठानाने करापोटी ११ लाखांची थकीत रक्कम धनादेशाद्वारे नगरपरिषदेकडे जमा केली आहे.
लाखो रुपयांच्या थकीत कर वसुलीसाठी वारंवार सूचना देवूनही भरणा केला जात नसल्याने नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. या अंतर्गत येथील दोन जिनिंगवर भूखंड जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्या जिनिंगमध्ये आंबेडकर वॉर्डातील बिर्ला कॉटसिन इंडिया लि. आणि दुर्गा माता वॉर्डातील राणा कॉटन या दोन जिनिंगचा समावेश होता. यापैकी कॉटसिन इंडिया लि.चे सहायक जनरल मॅनेजर (पर्सनल) व सुपरवायझर नागेश्वर दामोदर जिड्डेवार यांनी थकीत करापोटीचा ११ लाख दोन हजार ७९० रुपयांचा धनादेश नगराध्यक्ष नयना ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केला.
यावेळी नगरपरिषदेचे कर निरीक्षक भगवान बन्सोड, लेखापाल र.द. दिकुंडवार, लिपिक गजानन बुक्कावार, पाणीपुरवठा विभागाचे धीरज जाधव आदी उपस्थित होते. मालमत्ता जप्तीच्या धडक कारवाईने मात्र अनेक थकीत करदाते कराचा भरणा करण्यासाठी प्रोत्साहित झाले आहे. दुसरे राणा कॉटनकडे पाच लाख १८ हजार ६३८ रुपये थकीत आहे. ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)