किसान सन्मानधनाच्या पोर्टलवर घाटी शिवार बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:27 AM2021-06-23T04:27:17+5:302021-06-23T04:27:17+5:30
(फोटो) घाटंजी : शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री सन्मानधन योजना सुरू केली. मात्र, या योजनेच्या पोर्टलवर घाटंजी ...
(फोटो)
घाटंजी : शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री सन्मानधन योजना सुरू केली. मात्र, या योजनेच्या पोर्टलवर घाटंजी तालुक्यातील घाटी शिवाराची नोंदच नाही. त्यामुळे तब्बल १९८ शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून मदतीला मुकले आहेत. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन प्रशासनावर रोष व्यक्त केला.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सन २०१९मध्ये लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मदत देण्यात येते. मात्र, या लाभापासून घाटी शिवारातील १९८ शेतकरी वंचित असून, घाटी हे नाव या योजनेच्या पोर्टलवरच नाही. त्यामुळे तेथील सर्व शेतकरी वंचित आहेत. मात्र, इतरही योजनांपासून वंचित आहेत.
पोर्टलवर नाव येण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिली. मात्र, कार्यवाही झाली नाही. उलट कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांचा या योजनेसाठी उत्कृष्ट काम केल्यामुळे सत्कार केला गेला. परंतु, वंचित शेतकऱ्यांचे काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी केला. घाटी येथील शेतकरी सर्व योजनांपासून वंचित राहात आहेत. घाटीचे नाव लवकरात लवकर पोर्टलवर उपलब्ध व्हायला हवे व सर्व प्रलंबित शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे २०१९ पासून आतापर्यंत पैसे व इतर सर्व नुकसान भरपाई करून द्यावी अन्यथा आंदोलनासाठी तयार राहावे, असा इशारा महेश पवार यांनी दिला. यावेळी शेतकरी राजेश जाधव, केशव बोंद्रे, पांडुरंग भोयर, कृष्णराव सिंगेवार, नामदेव निमनकार, संजय बोंद्रे, अवधूत चौरागडे, विकास फुसे, लक्ष्मण गिरी, अरविंद गोरे, नागोराव सावसाकडे, जाफर इमाम खा पठाण, राजेश ठाकरे, संजय सावसाकडे, गोविंदा साखरकर, माया मंगाम, सुमन कनाके, मधुकर पेटेवार, जुबेर मिया देशमुख, शेखचंद कुरेशी, वासुदेव सिडाम, विष्णू शिंदे, मारुती नखाते, विठ्ठल शेंद्रे, दादाराव उदार, नीलेश भूत उपस्थित होते.
कोट
एका वर्षापूर्वी निवेदन देऊनसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. जेव्हापासून योजना डिजिटल झाल्या आहेत. तेव्हापासून जास्तीत जास्त वेळेस आम्ही वंचितच राहिलो. कारण पोर्टलवर घाटी नावच नाही. किसान सन्मान निधीपासून मदत मिळेल, अशी अपेक्षा केली. मात्र, तिथेसुद्धा काहीच नाही.
- राजेश जाधव, वंचित शेतकरी, घाटी