घोन्साचे नागरिक क्वॉरंटाईन प्रक्रियेवरून झाले संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:15+5:30
सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील जवळपास ३० महिला मजुरांना परसोडा येथे क्वॉरंटाईन केले होते. हे सर्व मजूर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी परत आणण्यात आले. यावेळी या महिलांनी प्रशासनापुढे तेथील समस्यांचा पाढाच वाचला. या मजुरांना कोविड सेंटरमधून आल्यापासून कुणी शेतकाम देण्यास तयार नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील घोन्सा येथे सोमवारी पुन्हा चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यासह संपर्कातील जवळपास ४५ ते ५० जणांना परसोडा येथे क्वॉरंटाईन करण्यात आले. मात्र या सेंटरवर असुविधा असल्याने या सर्वांना घोन्सा येथे आपआपल्या घरातच क्वॉरंटाईन करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. त्यावरून बुधवारपासून गावात चांगलेच रान पेटले आहे. कोविड सेंटरवर क्वॉरंटाईन केलेल्या लोकांना घरीच क्वॉरंटाईन करावे, या मागणीला घेऊन गुरूवारी गावकऱ्यांनी प्रशासनाला घेराव घातला.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमने, गटविकास अधिकारी राजेश गायनर, मुकूटबनचे ठाणेदार धर्माजी सोनुने यांनी गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. परसोडा येथील क्वॉरंटाईन सेंटरवर नागरिकांना उद्धटपणाची वागणूक दिली जात असून तेथे सुविधांचाही अभाव असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.
यापूर्वी सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील जवळपास ३० महिला मजुरांना परसोडा येथे क्वॉरंटाईन केले होते. हे सर्व मजूर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी परत आणण्यात आले. यावेळी या महिलांनी प्रशासनापुढे तेथील समस्यांचा पाढाच वाचला. या मजुरांना कोविड सेंटरमधून आल्यापासून कुणी शेतकाम देण्यास तयार नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात अनेक रोजमजुरी करणाऱ्या नागरिकांचे वास्तव्य असून काही शेतकरीदेखिल आहे. मात्र त्यांनाही क्वॉरंटाईन केल्याने शेतीवर परिणाम होत आहे. तसेच रोजमजुरी करून पोट भरणाऱ्या गोरगरिबांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना प्रशासनाने सुविधा द्यावी, अशी मागणीही यावेळी नागरिकांनी केली. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये न ठेवता जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार ज्यांच्याकडे व्यवस्था असेल त्यांना घरीच व ज्यांच्याकडे व्यवस्था नाही, त्यांना स्थानिक पातळीवरच क्वॉरंटाईन करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय संविधन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील शेतकरी-मजुरांना मुभा
घोन्सा येथील प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त शेतकरी व शेतमजुरांचे वास्तव्य आहे. या सर्वांशी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांनी चर्चा केली. या क्षेत्रातील नागरिकांना धान्याच्या किट पुरविण्यात आल्या. तसेच या परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना शेतात काम करण्यासाठी जायला मुभा देण्यात आली आहे.