संशयाचे भूत शिरले, वनरक्षक पत्नीला पतीने ठार केले

By admin | Published: January 22, 2017 12:11 AM2017-01-22T00:11:36+5:302017-01-22T00:11:36+5:30

तो औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीला अन् ती नर्स म्हणून खासगी रुग्णालयात कामाला. दोघेही दुरचे नातेवाईक़ यातून दोघांमध्ये प्रेम जुळले.

The ghost of suspect came and killed the conservative wife | संशयाचे भूत शिरले, वनरक्षक पत्नीला पतीने ठार केले

संशयाचे भूत शिरले, वनरक्षक पत्नीला पतीने ठार केले

Next

तो औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीला अन् ती नर्स म्हणून खासगी रुग्णालयात कामाला. दोघेही दुरचे नातेवाईक़ यातून दोघांमध्ये प्रेम जुळले. कुटुंबीयांनीही याला फारसा विरोध न करता दोघांचेही लग्न लावून दिले. औरंगाबादमध्ये भाड्याच्या घरातच राजाराणीचा संसार सुरू झाला. आणखी सुख मिळावे यासाठी पतीने पत्नीला स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रोत्साहित केले. त्याच्या पाठबळामुळेच तिला तब्बल नऊ वर्षांनंतर वनरक्षक म्हणून वनखात्यात नोकरी मिळाली. सुदैवाने पतीच्या गावाजवळच यवतमाळ तालुक्यात पोस्टींगही मिळाली. अन् इथेच माशी शिंकली. त्याच्या डोक्यात संशयाचे भूत घोंगावू लागले. जाच वाढल्याने तिला मुलींच्या वसतिगृहात आश्रय घ्यावा लागला.

उदात्त हेतूने चूल आणि मूल या चौकटीबाहेर पत्नीला काढण्यासाठी पतीची धडपड. त्याने तिला घरकामात मदत करून अभ्यासासह करिअर घडविण्यासाठी दिलेला वेळ. त्यासाठी केलेलं प्लानिंग अन् नंतर त्याचं आणि तिचं स्वप्न पूर्ण झाल्याने त्या दोघात निर्माण झालेला दुरावा. तिनं घराबाहेर पडावं, स्वत:ची ओळख निर्माण करावी यासाठी प्रोत्साहन देणारा तिचा पतीच छोट्या-छोट्या कारणावरून तिच्यावर संशय घ्यायला लागतो. या संशयाचं भूत इतकं बळावतं की तिला त्याच्यापासून दूर राहण्याशिवाय पर्यायच उरत नाही. अगदी ‘यशवंत’ या हिंदी चित्रपटातील कथानकासारखी घटना यवतमाळ लगतच्या जांब येथे घडली. यात पती हा बेरोजगार होता, तर पत्नी शासकीय नोकरीत होती.
पूनम रणजित भाटी (२७) असे पतीच्या संशयाची बळी ठरलेल्या विवाहितेचे नाव आहे. पूनम आणि तिचा पती रणजित हे दोघेही विवाहापूर्वी औरंगाबाद येथे राहात होते. या दोघांमध्ये दूरचे नातेसंबंध असल्याचे त्यांच्या २००६ पूर्वी झालेल्या भेटीत उघड झाले. रणजित हा नायलॉन कंपनीत कामाला होता, तर पूनम शिक्षणासोबतच एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करायची. येथेच अपघाताने रणजित व पूनमची भेट झाली. नंतर त्या भेटी वाढत गेल्या. दोघांमध्ये परस्परांविषयी ओढ निर्माण झाली. पूनमच्या लग्नाची चर्चा कुटुंबीयांनी केली तेव्हा तिने आपला जोडीदार निवडल्याचे सांगितले. या प्रेमविवाहाला कुटुंबीयांनीही संमती दिली. २००६ मध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रूद्रापूर येथे धुमधडाक्यात दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर दोघेही औरंगाबादमध्येच स्थायिक झाले. विवाहानंतरही पूनमने आपला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. यासाठी रणजितनेही तिला वेळोवेळी हवी ती मदत केली. पूनमच्या परिश्रमाला यश आले. २०१५ मध्ये ती वनविभागात वनरक्षक म्हणून रुजू झाली. वनरक्षक हा फिल्डवरचा जॉब असल्याने तिला घरी येण्या-जाण्याची बंधने पाळता येऊ लागली नाही. ती यवतमाळ तालुक्यातील येळाबारा वनक्षेत्रात रुजू झाली. नंतर ती १ आॅक्टोबर २०१६ पर्यंत प्रशिक्षणासाठी निघून गेली. दरम्यानच्या काळात रणजित हा औरंगाबाद येथील नोकरी सोडून मूळ गावी जांब येथे परत आला. आता तो केवळ पूनमच्या पगाराचा फडशा पाडणे एवढेच काम करत होता. यातूनच त्यांच्यात वाद होत होते. रणजितला वाटायचे पूनम आपल्याला टाळते, तर वारंवार रणजितकडून केली जाणारी चौकशी पूनमलाही जाचक वाटायला लागली. यातूनच खटके उडू लागले. कामाच्या ठिकाणी सातत्याने फोन करून रणजित तिला त्रस्त करू लागला. प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर पूनमने पती रणजितच्या घरी राहण्याऐवजी मुलींच्या वसतिगृहात स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तिला रणजितच्या वागण्यात बदल होईल अशी अपेक्षा होती. अनेकदा ती रणजितविरोधात तक्रारीसाठी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. मात्र तिने शेवटी निर्णय फिरविला व तक्रार दाखल केली नाही. सोमवारी सकाळी रणजित पूनमला घेण्यासाठी खासगी वसतिगृहात आला. त्याने पूनमला दुचाकीवर बसवून स्वत:च्या खरोली शिवारातील शेतात आणले. अन् तिथे पूनमशी वाद घालून तिच्यावर लाकडी दांडा, दगडाने हल्ला केला. यात पूनम जागेवरच गतप्राण झाली. घटनेची माहिती मिळताच रणजितचा भाऊ मनोज भाटी याने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच रणजितला ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक समाधान धनरे करीत आहेत.
जीवापाड जपणाऱ्या पत्नीवरच बेरोजगार रणजित संशय घेऊ लागला. तिची बदललेली दिनचर्या, कामाची पद्धत हे समजून घेण्याचा प्रयत्नच त्याने केला नाही. यातूनच त्याच्यावर तुरूंगात जाण्याची वेळ ओढवली, तर जिच्यासाठी त्याने कष्ट वेचले ती पत्नीच रणजितच्या वृत्तीने संशयाचा बळी ठरली.

Web Title: The ghost of suspect came and killed the conservative wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.