भरधाव कारने विद्यार्थिनीला चिरडले, उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 02:33 PM2019-08-20T14:33:55+5:302019-08-20T14:34:54+5:30
यवतमाळ येथील पिंपळगाव परिसरातील वेदधारिणी विद्यालयातील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आई सोबत पायी घरी जात असताना, तिला भरधाव कारने चिरडले.
यवतमाळ : येथील पिंपळगाव परिसरातील वेदधारिणी विद्यालयातील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आई सोबत पायी घरी जात असताना, तिला भरधाव कारने चिरडले. यात दोघी मायलेकी जखमी झाल्या. विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.
स्वराली गिरीधर चन्ने (१०) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. स्वराली ही इयत्ता पाचवीमध्ये होती. तिची आई शुभांगी तिला रोज घ्यायला येत असे. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर आई शुभांगी स्वरालीला घेवून दोनाडकर ले-आऊट मधील घरी जात असताना, मागून आलेल्या भरधाव कारने स्वरालीला धडक दिली. यात स्वराली गंभीर जखमी झाली तर आई शुभांगीला हाताला दुखापत आहे.
परिसरातील नागरिकांनी स्वरालीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा उपचारादरम्यान काही मिनीटातच मृत्यू झाला. या घटनेने पिंपळगाव परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भरधाव कार चालक हा सुद्धा याच परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात तक्रार दाखल झालेली नव्हती.