विद्यार्थिनीची मृत्यूशी सात तास झुंज व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2015 02:19 AM2015-09-19T02:19:24+5:302015-09-19T02:19:24+5:30
हलाखीशी झुंजत आईला आधार देत अकरावीपर्यंत मोठ्या निर्धाराने शिकलेली सोनाली मोठे स्वप्न बाळगून होती. मात्र एका प्रेमवेड्याच्या विक्षीप्तपणाने तिचा घात केला.
भोसकून खून : ‘मेडिकल’मधील अपुऱ्या साधनांचा बळी
यवतमाळ : हलाखीशी झुंजत आईला आधार देत अकरावीपर्यंत मोठ्या निर्धाराने शिकलेली सोनाली मोठे स्वप्न बाळगून होती. मात्र एका प्रेमवेड्याच्या विक्षीप्तपणाने तिचा घात केला. त्यातही तिने जगण्याची जिद्द सोडलीच नाही. तब्बल सात तास मृत्यूशी ती झुंजत राहिली. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तोकड्या साधनांनी तिचा पराभव केला.
यवतमाळ शहरालगतच्या लोहारा येथील देवीनगरात सोनाली (१७) ही तरुणी आपल्या आईसोबत राहत होती. १५ वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर ती आईचा एकमेव आधार होती. हलाखीच्या परिस्थितीतही ती आपले शिक्षण पूर्ण करीत होती. जवाहर कनिष्ठ महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिकतानाच कॉम्प्युटरचे क्लासही करीत होती. आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असलेली सोनाली आपले ध्येय गाठण्यासाठी धडपडत होती. तिच्या या स्वप्नांचा शुक्रवारी सकाळी एका प्रेमवेड्याने घात केला. सायकलने कॉम्प्युटर क्लाससाठी जात असताना तिला रस्त्यात गाठून चाकूने भोसकले. गंभीर अवस्थेत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तेवढ्यात देवीनगरातीलच एक विद्यार्थी तिच्या मदतीला धावून आला. त्याने तातडीने यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.
सकाळची वेळ असल्याने रुग्णालयातही सर्वच डॉक्टर उपस्थित होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोनालीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. चाकूने भोसकल्यामुळे सोनालीच्या लहान आतड्यांना आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमणीला गंभीर इजा झाली होती. रक्तस्राव झाल्यामुळे सोनाली बेशुद्ध अवस्थेत होती. अशाही स्थितीतून तिला बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मात्र शस्त्रक्रियेनंतर आवश्यक असलेली साधन सामुग्री बंद असल्याने डॉक्टरांचाही नाईलाज झाला. जीवनरक्षक प्रणाली व्हेन्टीलेटरवर तिला ठेवणे गरजेचे होते. परंतु गत काही महिन्यांपासून ‘मेडिकल’मधील व्हेन्टीलेटर बंद आहे.
त्यामुळे सोनालीला अंबूबॅगच्या मदतीने कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला. सोनालीची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र पुरेशा साधनाअभावी आणि रुग्णालयातील विभागाअंतर्गत असहकाऱ्याच्या भूमिकेचा तिला फटका बसला. सात तास मृत्यूशी झुंज देऊन सोनालीने अखेरचा श्वास घेतला. सात दिवसापूर्वी बाळंतिणीचा व्हेन्टीलेटर नसल्याने मृत्यू झाला होता. सोनाली ही व्हेन्टीलेटर नसल्याची दुसरी बळी ठरली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
लोहारावासीयांचा अधिष्ठाता अशोक राठोड यांना घेराव
सोनालीच्या मृत्यूनंतर संतप्त झालेले लोहारा येथील नागरिक सरपंच बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्या शासकीय निवासस्थानी धडकले. वैद्यकीय महाविद्यालयातील दुरावस्थेमुळेच सोनालीचा बळी गेला असा आरोप यावेळी करण्यात आला. व्हेन्टीलेटर बंद असल्याने रुग्णांना यातना सहन कराव्या लागतात. अंबू बॅग रुग्णांच्या नातेवाईकांनाच आॅपरेट करण्यास सांगितले जाते. यावेळी संतप्त नागरिकांनी अधिष्ठातांंना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी अधिष्ठातांनी या प्रकाराला वैद्यकीय महाविद्यालय दोषी नसून महाविद्यालय हे केवळ विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी असल्याचा अजब खुलासा केला. नवखे विद्यार्थी येथील साहित्य हाताळत असल्याने वारंवार ते नादुरुस्त होत असल्याचेही अधिष्ठातांनी सांगितले. यामुळे नागरिक आणखीनच संतप्त झाले. डॉक्टराच्या उद्धट वागणुकीबाबत जाब विचारला असता अधिष्ठातांनी सरळ हातवर केले. यावेळी जितेंद्र मोघे, फिरोज पठाण, विकास जोमदे, नितीन महल्ले, महेश जोमदे, दिनकर मडावी, रोशन पेटकर, अंकुश खंडरे, नीलेश बाळबुद्धे, अजय ढेरे, रितेश पांडे, सचिन महल्ले, दुर्गेश वाघाडे, भैय्या यादव, चंदन ठाकूर, अतुल उपाध्ये, सुहास जोमदे, चेतन पाली, प्रकाश शिंदे, बंटी ढेरे, कुंदन राठोड यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
शुभम ठाकूरचे धाडस
आपल्या परिसरातील मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून शुभम ठाकूर हा विद्यार्थी मदतीला धावून गेला. परिस्थितीचे भान ठेवत त्याने एका आॅटोरिक्षाच्या मदतीने सोनालीला शासकीय रुग्णालयात तत्काळ दाखल केले. त्याच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.
लोहारा एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करणारा ओमप्रकाश देवीनगर परिसरात वारंवार चकरा मारताना दिसत होता. मात्र याकडे परिसरातील नागरिकांसह सर्वांनीच दुर्लक्ष केले. त्याच्या या कृतीचा संदर्भ घेऊनच ओमप्रकाशवर चाकूहल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील गोन्ही गावचा तो रहिवासी आहे. लोहारा परिसरात तो वास्तव्याला होता.