कारमालकाला १५ लाख सव्याज द्या : 'आयसीआयसीआय लोम्बार्ड'ला चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:59 IST2025-02-17T10:56:54+5:302025-02-17T10:59:40+5:30

Yavatmal : अपघात प्रकरणात ग्राहक आयोगाचा निर्णय

Give 15 lakh interest to car owner: ICICI Lombard slapped | कारमालकाला १५ लाख सव्याज द्या : 'आयसीआयसीआय लोम्बार्ड'ला चपराक

Give 15 lakh interest to car owner: ICICI Lombard slapped

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
कारमालकाला १५ लाख रुपये सव्याज भरपाई देण्यात यावी, असा आदेश यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. वणी येथील दाम्पत्याने दाखल केलेल्या तक्रारीवर निर्णय देताना चालकही विमा संरक्षणास पात्र असल्याचे आयोगाने नमूद करत कंपनीला चपराक दिली.


प्रभाकर नामदेव जोगी यांच्या नावावर असलेली कार त्यांचा मुलगा अविनाश प्रभाकर जोगी चालवित होता. अपघातात त्याचा मृत्यू झाला. प्रभाकर जोगी यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या यवतमाळ येथील पेशवे प्लॉट शाखेत १५ लाखांचा विमा दावा दाखल केला. कंपनीने भरपाई नाकारली. अविनाश जोगी हा 'ओनर ड्रायव्हर' या संज्ञेत येत नसल्याची बाजू विमा कंपनीने मांडून भरपाई नाकारली.


चालक 'ओनर ड्रायव्हर' ...
आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये विमा पॉलिसीत 'लिमिटस ऑफ लिअॅबिलिटी-कव्हर फॉर ओनर ड्रायव्हर अंडर सेक्शन (३) (सीएसआय) रुपये १५ लाख' असा उल्लेख आढळला. अविनाश जोगी हा प्रभाकर जोगी यांचा मुलगा असल्याने तो ओनर-ड्रायव्हर या संज्ञेत येतो. त्यामुळे भरपाई द्यावी, असे आयोगाने म्हटले आहे.

अंतिम आदेश
पॉलिसी अंतर्गत देय असलेली रक्कम १५ लाख रुपये आणि त्यावर प्रकरण दाखल केल्यापासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यंत ८ टक्के व्याज द्यावे. मानसिक व शारीरिक त्रासाकरिता ५० हजार आणि तक्रारखर्चाचे २० हजार रुपये द्यावे, असा आदेश आयोगाने दिला आहे.


ग्राहक आयोगात धाव
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने भरपाई नाकारल्याने मंगला प्रभाकर जोगी आणि प्रभाकर नामदेव जोगी यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. या तक्रारीवर सुनावणीदरम्यान राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली यांनी दिलेल्या एका निर्णयाचा आधार घेण्यात आला. त्यानुसार जोगी यांना भरपाई देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला.

Web Title: Give 15 lakh interest to car owner: ICICI Lombard slapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.