दारू दिली, आता पाणीही द्या! यवतमाळात पालकमंत्र्यांच्या घरावर काँग्रेसचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:51 PM2018-05-08T14:51:48+5:302018-05-08T14:52:02+5:30
पालकमंत्री मदन येरावार यांनी शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नियोजनशून्य कामाच्या पद्धतीमुळे शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालकमंत्री मदन येरावार यांनी विशेष प्रयत्न करीत शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.
सर्वप्रथम मोर्चेकरी नगरपरिषद कार्यालयापुढे गोळा झाले. तेथे पाण्याच्या मागणीसाठी घोषणा दिल्या जात असतानाच पाण्यासाठी आणखी एक मोर्चा पालिकेवर धडकला. उमरसरा, संकटमोचन रोड परिसरातील सुमारे दोनशे महिलांचा हा मोर्चा आल्यानंतर दोन्ही मोर्चेकऱ्यांनी एकत्रितरित्या पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच केले. तेथे आधीच प्रचंड पोलीसफाटा तैनात करण्यात आला होता. दत्तचौक मागार्ने मोर्चा पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडकल्यानंतर महिलांनी सोबत आणलेले रिकामे मडके फोडून निषेध केला. एक ते दीड तास घोषणाबाजी सुरू होती. मोर्चेकऱ्यांनी पालकमंत्र्यांना फोन करून चचेर्साठी बाहेर या, म्हणून विनवणी केली. मात्र, पालकमंत्री आले नाही.
पालकमंत्री न आल्याने संतप्त महिलांनी बांगड्या फोडून पालकमंत्री हाय हाय, पालकमंत्री राजीनामा द्या, या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. तर दारू दिली आता पाणीही द्या असे नारे लावत दारूच्या बॉटलही फोडण्यात आल्या. यात एक काचेचा तुकडा उडून बंदोबस्तावरील महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या डोळ्याला लागून दुखापत झाली. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना दमदाटी करून निघून जाण्यास सांगितले. शेवटी मोर्चेकरी प्रचंड घोषणाबाजी करत निघून गेले. यावेळी पालकमंत्र्यांच्या घरापुढे फुटलेल्या बांगड्या मडक्यांच्या तुकड्यांचा खच पडला होता.
काँग्रेसला केवळ राजकारण करायचे आहे- पालकमंत्री
पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, बेंबळाचे पाणी आणण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत. टंचाई जनतेला आहे, कंत्राटदाराला थोडीच आहे? पाणीपुरवठ्याची तारीख मी जाहीर केली म्हणूनच काम गतीने होत आहे. तारीख दिली नसती तर वेळ लागला असता. आता काँग्रेसवाल्यांना राजकारण करायचे आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांनी त्यांच्या नेत्याला प्रश्न का विचारले नाही? जनता मात्र आम्हाला पूर्ण सहकार्य करीत आहे.