वंचित घटकांना योजनांचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 09:52 PM2017-12-13T21:52:00+5:302017-12-13T21:52:11+5:30
पारधी समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ तत्काळ द्या, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे यांनी येथील नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई व विकास कामांच्या आढावा बैठकीत दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पारधी समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ तत्काळ द्या, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे यांनी येथील नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई व विकास कामांच्या आढावा बैठकीत दिल्या. आजंती बेडा येथील पारधी समाजातील नागरिकांनी त्यांना भेडसावत असलेल्या समस्या बैठकीप्रसंगी मांडल्या. अध्यक्षांनी तत्काळ या गावाला भेट देऊन उपाययोजना करण्याचे निर्देश गटविकास अधिकाºयांना दिले. या सभेत जून २०१८ पर्यंत होणाºया संभाव्य पाणीटंचाईमध्ये तत्काळ उपाययोजना करण्याकरिता खासगी विहीर अधिग्रहण, टँकर, नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पुरक नळ योजना आदी उपाय केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. अतीतीव्र पाणीटंचाई जाणवल्यास प्रस्ताव थेट जिल्हा परिषदेकडे पाठविण्याची सूचना अध्यक्षांनी यावेळी केली.
चिखली कान्होबा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली नाही. मजीप्राच्या दुर्लक्षित धोरणाने या गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे सभापती मनीषा गोळे यांनी सांगितले. हा प्रश्न सोडविण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. दोनद येथील मंजूर कामे दोन दिवसात सुरू करावी, तर चुकीची माहिती दिल्याबद्दल ग्रामसेवकावर कारवाईचे आदेश देण्यात आले. खरडगाव येथे खनिज विकास निधीतून विहिरींचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शिरसगाव येथील हातपंप दुरुस्तीचे युनीट जिल्हा परिषदेकडेच ठेवावी, अशी मागणी सरपंचांनी केली. पिंपळगाव(डुब्बा) येथील एमआरईजीएसमधून पाणीटंचाईची कामे करतानाच काही नियम शिथील करावे, अशी मागणी सरपंचांनी केली. परंतु शासन निर्णयाप्रमाणे कामे करावी लागत असल्याने आपण शासनास विनंती करू असे अध्यक्ष माधुरी आडे यांनी यावेळी सांगितले. यानंतर विविध विभागांतर्गत इतर विषयांचा आढावा सभेत घेण्यात आला.
सभेला जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, पंचायत समिती सभापती मनीषा गोळे, उपसभापती समीर माहुरे, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत, वर्षा राठोड, भरत मसराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, तहसीलदार अमोल पोवार, नायब तहसीलदार मस्के, सहायक भूवैज्ञानिक पोतदार, पाणीपुरवठा उपअभियंत राणे, बांधकाम उपअभियंता देशमुख आदींची उपस्थिती होती.