शेतकऱ्यांना २५ हजार कोटींचे एकमुश्त पॅकेज द्या

By Admin | Published: August 9, 2014 11:57 PM2014-08-09T23:57:05+5:302014-08-09T23:57:05+5:30

निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांचे परिवार संकटात सापडले आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने २५ हजार कोटी रुपयांची एकमुश्त मदत द्यावी,

Give a one-time package of Rs 25,000 crore to farmers | शेतकऱ्यांना २५ हजार कोटींचे एकमुश्त पॅकेज द्या

शेतकऱ्यांना २५ हजार कोटींचे एकमुश्त पॅकेज द्या

googlenewsNext

विजय दर्डा : प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीची आमसभा
यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांचे परिवार संकटात सापडले आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने २५ हजार कोटी रुपयांची एकमुश्त मदत द्यावी, या मागणीचा पुनरूच्चार लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी शनिवारी येथे केला.
प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विजय दर्डा अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर आपण नेहमीच संसदेत सरकारचे लक्ष वेधतो. त्यांच्या समस्या पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न करतो. संसदेच्या चालू अधिवेशनात आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मागितले आहे. राज्यात आणि विशेषत: विदर्भातील शेतकरी, शेतमजूर विविध अडचणींचा सामना करीत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ या शेतकऱ्यांच्या जीवावर उठतो. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. हे सर्व प्रकार थांबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने पॅकेज द्यावे, अशी मागणी आपण संसदेत केल्याचे विजय दर्डा यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी ही जागतिक मंदीची लाट आणि विपरित परिस्थितीतही प्रगती करीत आहे. चायना मार्केट कोसळल्याने सूताला उठाव नाही. सूत गिरण्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी शासनाकडे मदत, अनुदान मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सूत गिरणी उभी करण्यासाठी घेतलेले कर्ज वेगाने परतफेड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरही ही सूत गिरणी नफ्यात आहे. सूत गिरणीचा निव्वळ नफा ३३ लाख ८५ हजार एवढा आहे. भागधारक, सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या एकजूट व परिश्रमामुळेच सूत गिरणी प्रगतीपथावर असून ती आणखी शिखर गाठेल, असा विश्वास विजय दर्डा यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने सूत गिरणीच्या सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे, संस्थेचे सभासद स्वातंत्र्य सैनिक ब्रम्हप्रसाद उपाख्य बी.जी. यादव आदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत गिरणीचे उपाध्यक्ष माजी आमदार कीर्ती गांधी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात सूत गिरणीचा एकूणच लेखाजोगा मांडला. चालू वर्षात प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी एकूण २८ हजार ७०४ चात्यांवर सूताचे उत्पादन करीत असल्याचे कीर्ती गांधी यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक सूत गिरणीचे संचालक माणिकराव भोयर यांनी केले.
या सर्वसाधारण सभेला सूत गिरणीचे संचालक किशोर दर्डा, डॉ. अनिल पालतेवार, डॉ. जाफरअली अकबरअली जीवाणी, सुधाकर बेलोरकर, प्रकाशचंद छाजेड, संतोषकुमार भूत, राजीव निलावार, संजय पांडे, अनिल मांगुळकर, जयानंद खडसे, कैलास सुलभेवार, डॉ. प्रताप तारक, लिलाबाई बोथरा, उज्वला अटल, महाव्यवस्थापक डॉ. सी.जेय रघुरामन आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Give a one-time package of Rs 25,000 crore to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.